कोल्हापूर : राज्यातील वीजबिलाचा प्रश्न असो की मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचे कोणतेही स्पष्ट धोरण नाही. कारण मंत्रिमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यकारभाराला कोणतीही दिशा दिली नाही. त्यांना प्रश्न समाजावून घ्यावे असे वाटत नाही. कारण उद्धव ठाकरे यांचा जन्म पक्ष चालवण्यासाठी झाला आहे. राज्य चालवण्यासाठी नाही. अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केली. मराठा आरक्षण प्रश्नाबद्दल झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होतो.
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले," वीज बिलामध्ये सवलत देण्याची तयारी मंत्री राऊत यांनी दाखवली. पण अजित पवार यांनी विरोध केला. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी सामोपचाराने मार्ग काढून सवलत देणे आवश्यक होते. पण त्यांनी यामध्ये लक्षच घातले नाही. मराठा आरक्षणाबद्दलही असेल आहे. मुख्यमंत्री हा मंत्रीमंडळाचा नेता असतो. जो सर्वांना एका दिशेने नेतो. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणतीही दिशा नाही. प्रश्न समाजावून घेण्याची त्यांची तयारी नाही. प्रशानावर त्यांची पकड नाही. मुळात उद्धव ठाकरे यांचा जन्म पक्ष चालवण्यासाठी झाला आहे. सरकार चालवण्यासाठी नाही. मुंबई महापालिकेची निवडणूकही त्यांनी कधी लढली नाही. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांना काम केले नाही. त्यांना प्रशासन कसे चालते हे सुद्धा माहिती नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सरकार चालवतील असे काही जणांना वाटत होते. मात्र ते तरी सरकारकडे लक्ष देतात का, असे वाटते.``
बाळासाहेबांची रणनीती योग्य
शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. पण त्यांनी सरकार बाहेर राहून सरकारवर अंकूश ठेवला. सरकारच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवले. नेता म्हणून त्यांची भूमिका अत्यंत योग्य आहे. समाजचा अंकूश सरकारवर असला पाहीजे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

