उद्धवसाहेब, बाळासाहेब "आणीबाणी'चे समर्थक होते की नव्हते !  - Uddhav Saheb, whether Balasaheb was a supporter of "Emergency" or not! | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धवसाहेब, बाळासाहेब "आणीबाणी'चे समर्थक होते की नव्हते ! 

प्रकाश पाटील 
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

ज्या इंदिरा गांधींच्या आणीबाणीला शिवसेनाप्रमुखांनी पाठिंबा दिला होता. त्याच कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर त्याच बाळासाहेबांचे पुत्र उद्धवजी आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत हा ही योगायोग मानावा लागेल. 

देशाचं कणखर नेतृत्व आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी आणली त्याला आता 45 वर्षे होऊन गेली, पण, इंदिरा गांधी आणि आणीबाणी याचा विसर काही आपल्या राजकीय नेत्यांना पडत नाही. या ना त्या कारणाने आणीबाणीचा उल्लेख होतच असतो. 

आणीबाणी (Emergency) हा भारताच्या इतिहासामधील 1975-77 दरम्यानचा 21 महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन पंतप्रधान गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्‍यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती. राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम 352(1) खाली आणीबाणी जारी केली. जी 25 जून 1975 पासून लागू झाली होती. 

इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस आदी विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले. तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. रा.स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. 

A letter to Indira Gandhi and one from Raja Rao - The Sunday Guardian Live

जनता आणीबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभी राहिली. समाजवादी पक्ष्याच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणीबाणी विरोधात तीव्र लढा दिला. या लढ्यात मृणाल गोरे,पन्नालाल सुराणा,प्रभूभाई संघवी आदीनीही मोठे योगदान दिले होते. 

महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता.  तसेच 1977 मध्ये निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचा प्रचार केला होता हे विसरता येणार नाही. 

त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पुढे शिवसेना-भाजप एकत्र आले. ज्या आणीबाणीला आणि इंदिरा गांधींना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. तीच शिवसेना कॉंग्रेसची कडवी विरोधक बनली. मराठीबरोबरच हिंदुत्वाकडे वळली. 

हे सर्व सांगण्याचं किंवा आठवण्याचं कारण असं की आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणीबाणीचा उल्लेख आपल्या भाषणात केला. निमित्त होते कॉंग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते, सहकार महर्षी, पद्‌मपूषण डॉ. बाळासाहेब विखेपाटील यांच्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचे. 

या पुस्तक समारंभात मुख्यमंत्री ठाकरे यांनी विखेपाटील घराण्याने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. तसेच बाळासाहेब विखे यांचा शिवसेना प्रवेश. बाळासाहेबांशी असलेले त्यांचे नाते याचीही आठवण सांगितली. 

उद्धव ठाकरे म्हणाले, की बाळासाहेब विखेपाटील यांना शिवसेनेत प्रवेश द्यायचा होता. त्यावेळी बाळासाहेबांना प्रश्‍न पडला की हे बाळासाहेब विखे तर इंदिरानिष्ठ आणि आणीबाणी समर्थक आहेत. त्यांना पक्षात कसं घ्यायचं. पक्षाचं कसं होईल ? मात्र याचा विचार बाळासाहेबांनी केला नाही आणि त्यांना पक्षात घेतलं. त्यांना केंद्रांत मंत्रीपदही दिलं. 

Remembering Bal Thackeray: 35 Rare Photos of Shiv Sena Supremo -  Photogallery

उद्धवसाहेबांना हे तर नक्कीच माहीत असणार की आपल्या वडीलांनी इंदिरा गांधीच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता म्हणून. इंदिरा गांधींच्या आणीबाणीचे नेहमीच बाळासाहेबांनी जाहीरपणे समर्थन केले होते. जर दोघेही समर्थक होते तर बाळासाहेबांना विखेंना पक्षात कसे घ्यायचा हा प्रश्‍न कसा काय पडू शकतो. शेवटी दोन्ही बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना त्यांच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता हे जगजाहीर आहे. ते तर इंदिरा गांधींचे आणि आणीबाणीचे समर्थक असे म्हणणे म्हणजे चुकीचे वाटते. विखे जर आणीबाणीचे समर्थक होते तर मग बाळासाहेब विरोधक होते का ?  असो. 

उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे कॉंग्रेसवाले काही आणीबाणीला विरोध करण्याचा प्रश्‍नच नाही. ज्या इंदिरा गांधींच्या आणीबाणीला शिवसेनाप्रमुखांनी पाठिंबा दिला होता. त्याच कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर त्याच बाळासाहेबांचे पुत्र उद्धवजी आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत हा ही योगायोग मानावा लागेल.

म्हणजेच इंदिरा गांधी,बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब विखे पाटील यांना आणीबाणीपासून दूर करता येणार नाही. म्हणूनच आणीबाणीच्या मुद्यावरून एका बाळासाहेबांना दुसऱ्या बाळासाहेबांना आणीबाणीच्या मुद्यावरून शिवसेनेत प्रवेश द्यायचा का ? असा प्रश्‍न खरंच पडला असेल ? हा ही प्रश्‍न आहे.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख