पूरग्रस्तांसाठी उदयनराजे यांची फेसबुक पोस्ट; म्हणाले... 

पूर येण्याची जर मानवनिर्मित कारणे असतील तर त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, तत्पूर्वी मदतकार्य वेगाने करावे अन्यथा जनतेचे श्राप-अश्राप सहन होणार नाहीत.
  Chhatrapati Udayan Raje Bhosle .jpg
Chhatrapati Udayan Raje Bhosle .jpg

सातारा :  राज्यातील अनेक भागात पुरामुळे हाहाकार उडाला आहे. रायगड, सातारा जिल्ह्यात तर पावसाचे रौद्र रुप बघायला मिळाले. अनेक गावांत…असंख्य घरांवर दरडी कोसळल्या आहेत. असंख्य कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. पुराच्या तडाख्यामुळे दुःखात बुडालेल्या पुरग्रस्तांना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayan Raje Bhosle) यांनी धीर दिला आहे. उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तसेच या पोस्टमधून प्रशासनाला इशारा दिला आहे. (Udayan Raje's Facebook post for flood victims) 

आपल्या फोसबुक पोस्टमध्ये उदयनराजे म्हणाले...महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बांधवांनो धीर सोडु नका, केंद्र आणि राज्य सरकार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील सर्व घटक, एनजीओज् आणि आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत. वित्तहानी कितीही झाली तरी आज ना उद्या ती भरून काढता येईल परंतु या परिस्थितीत आपण आपल्या परिवाराची काळजी घेऊन बाधित भागातील मदत कार्यात सहभाग घेणे आवश्यक आहे. तसेच मदत कार्य वेगाने व प्रामाणिकपणे सुरु करावे, मदत कार्य करताना जनतेला कमीतकमी त्रास, होईल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अन्यथा पुरग्रस्त जनतेचे श्राप-अश्राप भोगावे लागतील.

संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्ली येथे असलो तरी देखिल आमचे लक्ष पूरपरिस्थितीच्या पार्श्वभुमीवर पूर्णपणे महाराष्ट्र आणि विशेष करुन कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राकडे आहे. या भागातील पूरस्थितीची आणि भौगोलिक परिस्थितीची माहीती आम्ही केंद्रीय गृहमंत्रालय आणि मदत मंत्रालयाला दिली असून, केंद्राकडून भरीव मदत मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. पूरबाधित जिल्ह्यातील बाधितांना आणि अतिवृष्टीबाधित कुटुंबियांना भक्कम आधार देण्यासाठी आवश्यक ते सर्व मदत कार्य पोहोचल पाहीजे यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत.

महाराष्ट्रात विशेष करून कोकण, सातारा कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमद्धे ढगफुटी सारख्या सतत कोसळणा-या पावसामुळे विविध कारणाने अनेकांचे संसार उघडयावर आले आहेत. पूर येणे, दरडी कोसळणे, पुराच्या पाण्यात सर्वकाही वाहुन जाणे, रस्त्यांवर पाणी साचुन वाहतुक विस्कळीत होणे, अश्या अनेक घटना घडल्या आहेत. वित्त हानी प्रचंड प्रमाणात झाली आहे. काही ठिकाणी जीवित हानी देखिल झाली आहे. सरकारने मारले आणि आभाळ फाटले तर दाद कुठे मागायची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. निसर्गाच्या आणि भोंगळकारभाराचे असे अनेक फटके दुर्दैवाने गेल्या काही वर्षात काही अंतराने जरा जास्तच बसु लागले आहेत. त्यातच गेल्या सुमारे दिड वर्षापासून असलेल्या का नसलेल्या कोरोनाने जनता त्रासुन गेली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कटले आहे. संपूर्ण यंत्रणा कोलमडून गेली आहे.

परंतु कोणीही खचुन जावू नका, निसर्गाने संकटे दिली तरी त्यातुन मार्ग काढण्याची जिद्द आणि विवेक देखिल निसर्गच देत असतो. सर सलामत तो पगडी पचास वा उक्तीप्रमाणे आपले आणि आपल्या कुटुंबाचे बहुमूल्य जीवन महत्वाचे आहे. म्हणून सावधानता बाळगुन संयम ठेवा. संसार पुन्हा उभा करता येईल, त्यासाठी आम्ही स्वतःतातडीने शक्य ते सर्वप्रकारचे मदतकार्य सुरु करीत आहोत. 

राज्य सरकारच्या पाठीशी केंद्रसरकार आहे. विविध अशासकीय संस्था मदतकार्यासाठी पुढे आल्या आहेत. पूर येवून गेल्या ठिकाणी रोगराई पसरू नये म्हणून आम्ही स्वच्छता दूतांचा समावेश असलेली पथके तयार केली आहेत. आर्थिक, सहाय्याबरोबरच श्रम सहाय्य देखिल पुरविण्याचा आराखडा आम्ही हाती घेतला आहे. शासनकार्यवाहीला पूरक ठरेल असे कार्य हाती घेण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत पूरस्थितीत सापडलेल्यांना आधार देण्याचे काम केले जाईल निसर्गातील पाण्याला पुरेशी वाट मिळाली नाही. तर आजुबाजुला पूरपरिस्थिती निर्माण होते. तर मग आपल्या कार्यक्षेत्रातील नद्या, नाले, ओहोळ हे अरुंद झाले आहेत काय याची शोध मोहीम प्रशासनाने हाती घेणे आवश्यक आहे. 

गेल्या काही दशकातील पर्जन्यमान आणि अलिकडच्या काळातील पर्जन्यमान याचा विचार करता, पाऊस पूर्वीपेक्षा कमी-कमी होत आहे. असे असताना अश्या बारंबार घडणा-या घटनांमधुन आपण बोध घेणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे. पूरपरिस्थिती निर्माण होण्याची वास्तववादी कारणे प्रशासनाने जाहिर केली पाहीजेत. वाहुन गेलेले पूल आणि रस्त्यांची कामे कशी झाली होती. त्या त्या वेळी क्वालिटी कंट्रोल टेस्टींग झाले आहे काय, स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. काय इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती सध्याची आपत्कालीन परिस्थिती निवळल्यावर का होईना पण जनतेला द्यावी. पूर येण्याची जर मानवनिर्मित कारणे असतील तर त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, तत्पूर्वी मदतकार्य वेगाने करावे अन्यथा जनतेचे श्राप-अश्राप सहन होणार नाहीत. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com