कर्नाटकचे उपमुख्यमंत्री काय म्हणतात, त्यावर चंद्रकांत पाटील बोलतच नाहीत  - Uday Samant criticizes Chandrakant Patil over Karnataka border issue | Politics Marathi News - Sarkarnama

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री काय म्हणतात, त्यावर चंद्रकांत पाटील बोलतच नाहीत 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

सीमा प्रश्‍नाचे भाजपला काही देणे घेणे नाही.

कोल्हापूर : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणतात "चंद्र, सूर्य असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार.' यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कोणतीही भूमिका नाही. यावर ते काहाही भाष्य करत नाहीत. सीमा प्रश्‍नाचे भाजपला काही देणे घेणे नाही, अशी टीका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (ता. 1 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत केली. 

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी मंत्री उदय सामंत आज कोल्हापुरात आले होते. काळी फित लावून त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद झाली. त्यात सामंत बोलत होते. 

ते म्हणाले,"भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कर्नाटक सीमा प्रश्‍नाबाबत कोणतीच भूमिका नाही. तेथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवला तरी त्यांनी त्यावर कोणतेही भाष्य केले नाही. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सवदी हे चंद्र, सूर्य असेपर्यंत बेळगाव आमचेच राहणार म्हणतात, पण यावर चंद्रकांत पाटील काही बोलत नाहीत. कर्नाटक प्रश्‍नावर भाजपची कोणतीच भूमिका नाही. 

सीमेवर चीनचे सैन्य आत घुसते, त्यांना रोखत नाही. पण, काळा दिवस कार्यक्रमासाठी कर्नाटकात जाणाऱ्या मराठी भाषिकांना अडवतात. चंद्रकांत पाटील यांना इथे कोणताच जनाधार नाही. निवडणुकीत पडणार याची माहिती असल्याने ते पुण्यातून निवडणुकीला उभे राहिले. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मागे शिवसेना ठामपणे उभी राहिली. सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही शैक्षणिक संकुल उभारत आहोत. यावर्षीपासून तेथे अध्यापन सुरू होईल. यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांना मातृभाषेतून व्यावसायिक अभ्यासक्रम करता येतील,' असेही सामंत यांनी सांगितले. 

तुम्ही तारीख सांगा... 

मंत्री सामंत म्हणाले, ""महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊन दाखवावे, असे आव्हान तिथले उपमुख्यमंत्री स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी देतात. यापूर्वी अनेकवेळा शिवसेनेच्या मंत्र्यांनी बेळगावात जाऊन आंदोलन केले आहे. पण मी कर्नाटक सरकारला आव्हान देतो. तारीख आणि वेळ तुम्ही सांगा. मी व येथील शिवसैनिक कर्नाटकात येऊन दाखवतो. त्यानंतर मग सर्व गोष्टींवर चर्चा करू.'' 

हेही वाचा : महाराष्ट्रात मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच सामील होईल : जयंत पाटील 

मुंबई : महाराष्ट्रात आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच सामील होईल अशी खात्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज मराठी बांधवांच्या समर्थनार्थ काळा दिवस पाळला आहे. काळ्या फिती लावून हा निषेध व्यक्त करण्यात आला. जयंत पाटील यांनीही काळी फीत लावून कामकाज केले. 

कर्नाटकमधील मराठी सीमा वासियांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार व जुलुम याचा निषेध राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते काळी फित लावून करत आहेतच शिवाय मंत्रीही निषेध व्यक्त करत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राज्यातील जनता सीमा भागात अडकलेल्या लोकांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी आहे. सुप्रीम कोर्टात केस सुरू असली तरी कर्नाटकमधील मराठी बांधवांवरील अत्याचार थांबलेला नाही, त्याचाही निषेध करत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख