रुग्णवाहिका मिळत नसल्याने पुण्यात पत्रकाराचा मृत्यू; सरकारी व्यवस्थेचे पितळ उघडे - tv reporter looses his life due unavailability of ambulance in pune | Politics Marathi News - Sarkarnama

रुग्णवाहिका मिळत नसल्याने पुण्यात पत्रकाराचा मृत्यू; सरकारी व्यवस्थेचे पितळ उघडे

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

याबाबत विरोधी नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.

पुणे : कोरोना काळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.

रायकर यांच्या मृत्यूमुळे पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यात नव्याने सुरू झालेल्या आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या रुग्णालायत सुरवातीला व्यवस्थित उपचार झाले नाहीत. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी रुगणवाहिका मिळू शकली नाही.

याबाबत विरोधी नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी आता तरी घरातून बाहेर पडून राज्याची परिस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेने प्रवीण दरेकर यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रकार गंभीर असून आपण सरकारशी बोलणार असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी याबाबत पत्रकारांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र ते बोलले नाहीत.

नेमकं काय घडलं?

पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास, त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन उपचार.
पांडुरंग रायकर यांची 27 ऑगस्टला कोरोना चाचणी, मात्र अहवाल निगेटिव्ह

दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला पांडुरंग रायकर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले.

गावी गेल्यावरही त्रास झाल्यामुळे कोपरगावमधे अँटीजेन टेस्ट, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह

रविवार 30 ऑगस्टला रात्री त्यांना अँब्युलन्समधून उपचारांसाठी पुण्यात आणलं, पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमधे भरती केलं.

जम्बो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर आयसीयूमधे उपचार सुरु होते, मात्र त्यांची परिस्थिती खालावत होती
रायकर यांना खाजगी हॉस्पिटलमधे दाखल करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरु केले

काल (मंगळवार 1 सप्टेंबर) त्यांची ऑक्सिजन पातळी 78 पर्यंत खाली गेली.

जम्बो हॉस्पिटलमधून अन्यत्र नेण्यासाठी कार्डिॲक अँब्युलन्सची गरज होती. रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मंगळवारी रात्री एक अँब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहचली, पण त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाल्याचं सांगितलं गेलं.

दुसरी अँब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते, पण त्यात डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत रात्रीचे बारा-सव्वाबारा वाजले होते.

पहाटे चार वाजता अँब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरु झाला पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता अँब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आयसीयूमधील डॉक्टरांचा ‘आम्ही निघत आहोत’ असा फोन आला.
पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि नातेवाईक जम्बो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं.
कार्डिॲक अँब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहचली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख