विधानपरिषदेच्या सहा मतदारसंघात ६९ टक्के तर 'पुणे पदवीधर'मध्ये सर्वात कमी मतदान - The turnout in the teacher constituency is higher than in the graduate constituency, which is the lowest in the Pune constituency. | Politics Marathi News - Sarkarnama

विधानपरिषदेच्या सहा मतदारसंघात ६९ टक्के तर 'पुणे पदवीधर'मध्ये सर्वात कमी मतदान

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 डिसेंबर 2020

सर्वाधिक मतदार असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात ते सर्वात कमी झाले आहे. पदवीधरपेक्षा शिक्षक मतदासंघात मतदानाचा टक्का जास्त आहे.

पिंपरी : विधानपरिषदेच्या कालच्या निवडणुकीत ६९ टक्के मतदान झाले. अपेक्षेपेक्षा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा ते जास्त आहे. मात्र, सर्वाधिक मतदार असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात ते सर्वात कमी झाले आहे. पदवीधरपेक्षा शिक्षक मतदासंघात मतदानाचा टक्का जास्त आहे.

तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी अशा सहा मतदारसंघांसाठी ही निवडणूक झाली. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जिल्ह्यात सर्वात कमी मतदान हे सर्वात जास्त मतदार आणि बुद्धिजीवींच्या शहराचा (पुणे)समावेश असलेल्या पुणे जिल्ह्यात झाले. तेथे पदवीधरला ४४ ८७, तर शिक्षकसाठी ५८.४३ मतदान झाले. सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यात झाले. तेथे पदवीधरसाठी ६८.०९ आणि शिक्षकमतदारसंघात ८६.७७ एवढे  मतदान झाले आहे.

मतदानाचा टक्का वाढला, धास्ती वाढली... 
 
नागपूर : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काल झालेल्या मतदानात सकाळपासूनच मतदार उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यावेळी भाजप आणि महाविकास आघाडी, अशी थेट लढत झाली. त्यामुळे निकालाची उत्सुकता अधिक आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास २० टक्के अधिक मतदान झाल्याने सर्वच उमेदवार धास्तावले आहेत. वाढलेला टक्का कोणाला पहिल्या क्रमांकाची पसंती देतो, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. एकूणच पहिल्या पसंती क्रमाने विजयी होण्यासाठी उमेदवाराला सुमारे साठ हजार मतांचा कोटा पूर्ण करावा लागणार आहे. 

पदवीधर निवडणुकीत सरासरी ६० टक्के मतदान झाले असून भाजपचे उमेदवार संदीप जोशी, काँग्रेसचे अभिजित वंजारी, विदर्भवादी नितीन रोंघे, वंचित बहुजन आघाडीचे राहुल वानखेडे, विनोद राऊत, प्रवीण डेकाटे यांच्यासह १९ उमेदवारांचे भाग्य सीलबंद झाले आहे. उद्या गुरूवारी सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण झाला नाही तर रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू राहू शकते. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत मतदानाची टक्केवारी अवघी ३७ टक्के इतकी होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख