तुकाराम मुंढे म्हणाले, “अब मै चल पडा मेरे राह की ओर...” - Tukaram Mundhe says Now I have to walk towards my path  | Politics Marathi News - Sarkarnama

तुकाराम मुंढे म्हणाले, “अब मै चल पडा मेरे राह की ओर...”

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

प्रत्येक निर्णय हा जनतेच्या भल्यासाठी घेतला याचे समाधान नक्कीच आहे. या काळातील अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून कामात येईल, यात शंका नाही.

पुणे : आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. ती पण बदली रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंढे हे आता विनापदाचे असून त्यांच्यासाठी नवीन पोस्ट शोधली जात आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या आदेशानंतर त्यांनी एक व्हिडिओ फेसबुकवरून शेअर केला आहे. यात त्यांनी नागपूरकरांचे आभार मानले आहे. 

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. ते पण स्वभावाने तिखट आहे. त्यांचा आणि मुंढे यांचा सामना कसा रंगणार, याची उत्सुकता होती. मात्र मुंढे हे तेथे रूजू होण्याच्या आधीच त्यांची तेथील बदली रद्द झाली.. मुंढे हे कोरोनातून दोन दिवसांपूर्वीच बरे झाले आहेत. त्यामुळे ते लगेच कार्यभार स्वीकारणार नव्हते. तो स्वीकारायच्या आधीच तेथे इतर अधिकारी नेमण्यात आले.

मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्य़भार देण्यात आला आहे. निंबाळकर हे जळगावचे जिल्हाधिकारी होते. त्यामुळे त्यांच्या कारभाराची गुलाबराव पाटील यांना पूर्वकल्पना आहे. परिणामी मुंढे यांच्याऐवजी पाटील यांना निंबाळकर हे पसंत पडले असण्याची शक्यता आहे. मुंढे हे प्राधिकरणात आल्यानंतर या दोघांत वादाच्या ठिणग्या पडण्याची शक्यता व्यक्त झाल्यानंतर पाटील यांनी माझे आणि मुढे यांचे काम पाणी पुरविण्याचे आहे. त्यामुळे आमच्या दोघांत आग कशी लागेल, असा सवाल करत मुंढेंच्या नियुक्तीला विरोध नसल्याचे स्पष्ट केेले होते. प्रत्यक्षात त्यांनी मुंढे यांना टाळले तर नाही ना, अशी चर्चा आता मंत्रालयात आहे. 

तुकाराम मुंढे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, "नुकतंच कोव्हिड विषाणूच्या संक्रमाणातून मुक्त झालो. अनेकांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आलेल्या प्रत्येकाला भेटण्याचा मी प्रयत्न केला. माझ्याप्रती असलेल्या प्रत्येकाच्या भावनांचा मी आदर करतो. आपण दिलेल्या प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन अशी ग्वाही यानिमित्ताने देतो.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कर्तव्य बजावलेला सात महिन्यांचा काळ माझ्यासाठी खूप काही शिकविणारा ठरला. कोव्हिड महामारीच्या निमित्ताने मनपा आयुक्त म्हणून जे अधिकार प्राप्त झाले, त्या अधिकाराचा उपयोग उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी कठोर निर्णय घेतले. त्यावर टीका झाली. मात्र, प्रत्येक निर्णय हा जनतेच्या भल्यासाठी घेतला याचे समाधान नक्कीच आहे. या काळातील अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून कामात येईल, यात शंका नाही.

जे-जे चांगले शिकायला मिळाले, ते शिकलो. काही कटू अनुभव असतीलही; मात्र त्यातूनही बोध घेतला. नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी उद्या मुंबईला रवाना होतोय. जेथे कुठे असेल, आपले प्रेम कायम सोबत असेल. या शहरासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न केला, याचा अभिमान असेल. नागपूर महानगरपालिकेतील कटू-गोड आठवणींसह मनपाला Good bye. आपण सर्वांनी जी साथ दिली त्याबद्दल Thank you...!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख