हिंजवडी, वाघोलीसह हवेली आणि मुळशीतील 28 गावांत टोटल लाॅकडाऊन!

वाघोलीपासून ते हिंजवडीपर्यंतच्या गावांचा समावेश यात आहे.
pune collector
pune collector

पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीबाहेरील  नजिकच्या गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आता खबरदारी म्हणून विविध पावले उचलण्यात येत आहे. त्यामुळे हवेली आणि मुळशी या दोन तालुक्यांतील 28 प्रमुख गावांत कंटेन्मेंट झोन किंवा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.

हवेलीतील वीस गावांत पूर्णपणे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात उद्यापासून कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येणार. यात हिंजवडीसह, माण, मारुंजी, जांबे, नेरे या गावांचा समावेश आहे. 

मुळशी तालुक्यात कोरोनाने दोन दिवसांपूर्वीच शंभरी पार केली असून द्विशतकाकडे वाटचाल सुरू आहे. हा वाढता प्रसार लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील पूर्व भागातील पिरंगुट , नांदे , चांदे व सूस आदी गावांत आज मध्यरात्रीपासून आठवडाभर  ' जनता कर्फ्यू ' पाळण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनीच स्वेच्छेने आज बुधवार दिनांक ८ जुलै रात्री १२ वाजल्यापासून ते गुरुवार दिनांक १६ जुलै या कालावधीसाठी हा कडक लॅाकडाऊनचा निर्णय 
घेतल्याने प्रशासन व पोलिसांनीही त्याचे स्वागत केले आहे. जी व्यक्ती विनाकारण घराबाहेर येईल , त्या व्यक्तीवर जनतेच्या माध्यमातून कायदेशीर करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत घरपोच सेवाही बंद करण्याचे आवाहन केलेले आहे.  

हवेली तालुक्‍यांतील या 20 गावांत कंटेन्मेंट झोन

हवेली तालुक्यातील 20 गावांमध्ये कंटेन्मेट झोन जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गावांमधील नागरिकांना बाहेर जाण्यास किंवा इतरांना प्रवेशास बंदी राहणार आहे. हवेली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ज्या गावांमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळतील अशा गावांमध्ये सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र ऐवजी ग्रामपंचायतीच्या पूर्ण हद्दीत कंटेन्मेट झोन जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर यांनी याबाबतचे आदेश बुधवारी सायंकाळी जारी केले. 8 जुलैच्या रात्री बारा वाजल्यापासून हे आदेश लागू राहतील. 

कंटेन्मेंट झोन :
मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्ती,  न-हे, न्यू कोपरे, खानापूर,  शेवाळेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, वाघोली, खडकवासला, किरकटवाडी,  पिसोळी, वडाची वाडी, भिलारेवाडी, उरूळी कांचन,  लोणी काळभोर, नांदेड, मांजरी खुर्द, कुंजीरवाडी कोंढवे-धावडे आणि देहू.

हिंजवडी परिसरात उद्यापासून सोळा जुलैपर्यंत कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. दरम्यान, यामधून आयटी कंपनी तसेच बांधकाम सुरू असलेल्या साईटना वगळण्यात आले आहे. अशी माहिती हिंजवडीच्या महिला सरपंच आरती वाघमारे आणि मारुंजी येथील महिला सरपंच पूनम समीर बुचडे यांनी दिली आहे..  

काय राहणार कंटेन्मेंट झोनमध्ये

 - नागरिकांना प्रवेशास बंदी राहील. 
- प्रतिबंधित क्षेत्रातून अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणाऱ्या व्यक्ती आणि वैद्यकीय अत्यावश्यक सेवांकरिता प्रवेश राहील
- पूर्व तपासणीशिवाय प्रतिबंधित क्षेत्रात व्यक्ती आणि वाहनांना प्रवेश करता येणार नाही. 
- प्रतिबंधित क्षेत्रात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या व्यक्तींच्या नोंदी ठेवणे आवश्यक
- प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू  अॅप डाऊनलोड करणे आवश्यक.
- 65 वर्षांवरील सर्व व्यक्ती, अति जोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, वय वर्ष 10 पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.
- बँकांची कामकाजाची वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत राहील. ए.टी.एम. केंद्रे पूर्णवेळ कार्यान्वित ठेवावीत.
- प्रतिबंधित क्षेत्रात सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंतच दूध, भाजीपाला, फळे व इतर जीवनावश्यक व अत्यावश्यक सोयी सुविधा सुरु राहतील.
- एक किंवा दोन रुग्ण आढळल्यास त्या परिसरातील उद्योग व औद्योगिक आस्थापना सुरु राहतील.
- सोसायटीमध्ये रुग्ण आढळल्यास मायक्रो कंटेन्मेट झोन त्या सोसायटीपुरताच मर्यादित राहील. 
- रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. सर्व उद्योग व आस्थापना बंद करणेत येऊ नये. हे आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

Edited By- Yogesh Kute

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com