बीड : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यात गुरुवारी (ता. १७) सर्व ग्रामपंचायत, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धातास धरणे आंदोलन आणि शुक्रवारी (ता. १८) घरोघरी सांयकाळी ६ वाजता घंटानाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीत मराठा समाजातील तरुणांनी मते मांडली. समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी चर्चा करण्यात आली. बैठकीत पहिल्या टप्प्यात गुरुवारी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत मराठा समाजाने अर्धातास धरणे आंदोलन करत आपल्या मागण्यांचे निवेदन ग्रामसेवक, तलाठी यांना द्यावयाचे आहे.
तालुकास्तरावर अर्धातास धरणे आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन द्यायचे आहे, तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धातास धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मराठा समाज आपआपल्या घरी गॅलरीत किंवा घराच्या छतावर घंटानाद आंदोलन करेल, असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, यापुढे आरक्षण जाहीर केले नाही तर समाज रस्त्यावर उतरेल, असा इशाराही देण्यात आला.
भानुदास जाधव, अॅड. मंगेश पोकळे, प्रमोद शिंदे, अजित वरपे, भास्कर गायकवाड, राजेश भुसारी, भाऊसाहेब डावकर, अनिल घुमरे, स्वप्नील गलधर, रमेश चव्हाण, महेश धांडे, मळीराम यादव, गणेश मस्के, रवी शिंदे, सागर बहीर, राहुल टेकाळे, संतोष जाधव, किशोर गिराम, अॅड. गणेश मोरे, विठ्ठल बहीर, गोरख शिंदे हे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम करणार आहेत.
मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू, असा दिलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दिला. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने समाजात त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन , त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते. पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम आपण सहन करत कामा नये, असेही आवाहन त्यांनी केले.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी याबाबत राज्य सरकारवर टीका केली असून समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते, अशी भूमिका मांडली आहे. या स्थगितीवर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली होती. मात्र उदयनराजेंचे मत आले नव्हते. त्यांनी ते आज सविस्तरपणे मांडले आहे. याबाबत ते म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार कधीच गंभीर नव्हते. त्यामुळे आज त्याचा परिणाम मराठा समाजाला भोगावा लागत आहे. मी सरकारला जाहीर आवाहन करतो. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. कारण मराठा समाज आता एकटा नाही एवढच सांगतो. मी तुमच्या सोबत आहे, असाही इशारा त्यांनी दिला.