#मराठा आरक्षण ; मुंबईच्या बैठकीला उदयऩराजेंची पाठ...साताऱ्यात बैठकीचा घाट.. - Today will be the strategy regarding Maratha reservation | Politics Marathi News - Sarkarnama

#मराठा आरक्षण ; मुंबईच्या बैठकीला उदयऩराजेंची पाठ...साताऱ्यात बैठकीचा घाट..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

आजच्या बैठकीत विविध मुद्दांवर चर्चा होणार असून त्यात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत. 

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत रणनिती ठरविण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता मुंबईत तुंर्भे येथील स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या माथाडी कामगार संघटनेच्या माथाडी भवनमध्ये राज्यस्तरीय बैठक होत आहे. यानिमित्ताने छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे एकाच व्यासपीठ येणार होते, पण उदयनराजेंनी या बैठकीकडं पाठ फिरवली आहे. ते साताऱ्यात स्वतंत्र बैठक घेणार आहेत.  

या बैठकीतील निर्णयांकडे राज्यातील मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. आजच्या बैठकीत विविध मुद्दांवर चर्चा होणार असून त्यात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत. 

पुण्यातील मराठा आरक्षणाबाबत मराठा संघटना आणि नेत्यांमधील समन्वयासाठी बोलावलेल्या बैठकीला खासदार छत्रपती उदयनराजे येणार होते. मात्र. एका नेत्याने केलेल्या फोनमुळे छत्रपती उदयनराजे या बैठकीला आले नाहीत, असा गौप्यस्फोट शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला. आहे.

आरक्षणाच्या प्रश्‍नावर विचार करण्यासाठी राज्यातील सर्व मराठा संघटनांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी आमदार विनायक  मेटे यांच्या पुढाकाराने पुण्यात नुकतीच बैठक झाली. 

या बैठकीवरून मराठा नेत्यांमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोपांची चर्चा माध्यमातून झाल्यानंतर मेटे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. बैठकीला खासदार छत्रपती उदयनराजे यांनी येण्याचे मान्य केल होते. मात्र, ऐनवेळी एका नेत्याने केलेल्या विनंतीमुळे त्यांनी या बैठकीला येण्याचे टाळले, असे मेटे यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘मराठा सामाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नावर राज्यातील मराठा नेत्यांनी स्वतंत्रपणे बैठका न घेता एका व्यासपीठावर यावे ही माझी भूमिका होती. सर्वानी एकत्र येऊन राज्य सरकारवर दबाव आणावा, ही माझी ही बैठक घेण्यामागील भावना होती. छत्रपती उदयनराजे यांनी आवाहन केल्यानंतर त्यांच्या भूमिकेचा आदर करीत राज्यातील समाजाचे सर्व नेते एकत्र येतील, अशी या मागील माझी भावना होती. त्यात कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. मात्र, मी बोलावलेल्या या बैठकीला छत्रपती उदयनराजे यांनी येऊ नये, अशी भूमिका असलेल्या एका नेत्यामुळे छत्रपती उदयनराजे बैठकीला आले नाहीत. मी या संदर्भात त्यांच्याशी बोललो. मात्र, माझी यायची इच्छा होती, असे उदयनराजेंनी स्पष्ट केले.’’

आरक्षणाच्या विषयावर अनेक नेते बोलत आहेत. मात्र, मराठा आरक्षणाचे नुकसान होऊ नये, याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या विषयात राज्य सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे. न्यायालयात योग्य तयारीनीशी बाजू न मांडल्याने मराठा समाजावर आरक्षण गमावण्याची वेळ आली आहे. या पुढील काळात राज्य सरकारने अधिक जबाबदारीने काम करण्यासाठी मराठा समाजाने एकत्रित येऊन दबाव आणण्याची वेळ आली आहे, असे मेटे यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख