कंगना पाठोपाठ आता भाजप खासदार रुपा गांगुली मैदानात उतरल्या ! - Tired of accusing Kangana, now BJP MP Rupa Ganguly has come on the field! | Politics Marathi News - Sarkarnama

कंगना पाठोपाठ आता भाजप खासदार रुपा गांगुली मैदानात उतरल्या !

वृत्तसंस्था
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

आता रूपा गांगुली यांनी बॉलिवूड आणि मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे. 

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणावत हिच्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार रुपा गांगुली यांनीही मुंबई पोलिसांना लक्ष्य केले आहे. मुंबई फिल्म इंडस्ट्री लोकांचे जीव घेत आहे. त्यांना ड्रग ऍडिक्‍ट बनवित आहे. महिलांचा अपमान होत असताना मुंबई पोलीस का शांत आहेत असा सवाल केला आहे. गांगुली यांनी आज तसे ट्‌विट केले असून त्यांनी संसद भवन परिसरात निषेधही केला आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणानंतर अभिनेत्री कंगना राणावत हिनेही बॉलिवूडविषयी काही प्रश्‍न करतानाच सुशांत हा बॉलिवूडमधील घराणेशाहीचा बळी असल्याचा सणसणीत आरोप केला होता. इतक्‍यावरच न थांबता तिने मुंबईची तुलना पीओके अशीही केली होती आणि मुंबई पोलिसांवरही आरोप केले होते. मुंबईला पीओके म्हटल्यानंतर शिवसेनेचे पित्त खवळले होते आणि शिवसेनेने तिच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. 

त्यानंतर कंगना आणखीच संतप्त झाली होती. तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता टीका करायला सुरवात केली होती. शिवसेनेने कंगनावरील राग तिचे घर पाडून व्यक्त केला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत टीका केली होती.

तसेच तिचे घर पाडल्यामुळे कंगनाला थोडी सहानुभूती मिळाली खरी. पण, शिवसेना आणि कंगना असा सामना रंगला होता. शेवटी तिने अचानक एक दिवस ट्‌विट करून मुंबई सोडण्याचा निर्णय जाहीर केला. मला मुंबईत भिती वाटते असे कारण तिने दिले होते. 

Entertainment Journalists To Boycott Kangana Ranaut After Spat With Reporter

तिच्या मुंबई सोडण्याच्या निर्णयावर मराठी माणसांनी तिला लक्ष्य करीत ट्रोल केले होते. कंगनाबाई, पुन्हा मुंबईत कधीच येऊ नको, तुझ्या घरी तू सुखी राहा अशा संतप्त प्रतिक्रियाबरोबरच सल्लाही दिला होता. 

आता कंगनापाठोपाठ भाजपच्या खासदार रुपा गांगुली यांनीही मुंबई पोलिसांना लक्ष्य करीत काही प्रश्‍न उपस्थित केले आहे. गांगुली यांनी महाभारत मालिकेत कुंतीची भूमिका केली आहे. त्यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की मुंबई फिल्म इंडस्ट्री लोकांचे जीव घेत आहे आणि लोकांना ड्रग्ज ऍडिक्‍ट करीत आहे. महिलांचे अपमान करीत आहे तरीही कोणी काही बोलत नाही. मुंबई पोलीस कसे काय शांत आहेत. असे प्रश्‍न करीत गांगुली यांनी संसद भवन परिसरात आंदोलन केले. 

खरेतर गेल्या दोन अडीच महिन्यापासून सुशांतसिंह प्रकरण गाजत आहे. महाराष्ट्र, बिहारसह देशभर वातावरण ढवळून निघाले आहे. सीबीआयने या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला अटक केली आहे ते सध्या तुरूंगात आहेत. आता रूपा गांगुली यांनी बॉलिवूड आणि मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे. 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख