धक्कादायक : तीन महिलांना कोरोनाऐवजी दिली रेबीजची लस... - Three women have been vaccinated for anti rabies instead of corona | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : तीन महिलांना कोरोनाऐवजी दिली रेबीजची लस...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

लस घेतल्यानंतर एका 70 वर्षीय महिलेला अचानक चक्कर आली.

लखनऊ : देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेतील तिसरा टप्पा सुरू आहे. ठिकठिकाणी लसीकरण केंद्रांची उभारणी करून नागरिकांना लस उपलब्ध करून दिली जात आहे. पण या लसीकरण मोहिमेमध्ये अनेकदा गंभीर त्रुटी असल्याचेही समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात अशीच एक गंभीर घटना समोर आली आहे.

शामली जिल्ह्यातील कांधला येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना लस घेण्यासाठी गेलेल्या तीन महिलांना अँटी रेबीज लस दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतच तक्रार थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आली आहे. या तीनही महिला ज्येष्ठ असल्याने त्यातील एका महिलेला ही लस घेतल्यानंतर अचानक त्रास सुरू झाला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

तिघींनी आरोग्य केंद्रावर डोस घेतल्यानंतर त्या घरी आल्या. त्यातील एका 70 वर्षीय महिलेला अचानक चक्कर आली. नातेवाईकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. तेथील डॅाक्टरांनी लसीबाबत माहिती विचारल्यानंतर त्यांना आरोग्य केंद्रातून दिलेली चिठ्ठी दाखविण्यात आली. त्यावर अँटी रेबीज लस लिहिल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. त्यानंतर या महिलेसोबत लस घेण्यासाठी गेलेल्या इतर दोन महिल्यांकडील चिठ्ठीही पाहण्यात आली. त्यावरही रेबीजची लस दिल्याचे म्हटले होते.

आरोग्य केंद्राचे प्रभारी डॅा. विजेंद्र सिंह यांनीही या महिलांना रेबीज लस दिल्याचे सांगितले. तसेच चौकशी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॅा. संजय अग्रवाल यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे. कोरोना व रेबीजची लस देण्याचे काम वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे. दोन्ही ठिकाणचे कर्मचारीही वेगळे आहेत. या महिला चुकून रेबीज कक्षात गेल्या असतील. याबाबत चौकशी सुरू आहे, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. 

जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनीही चौकशीचे आदेश दिले आहे. दोन अधिकारी आज रुग्णालयात जाऊन चौकशी करतील. संबंधित तीनही महिलांचे तसेच तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले जातील. यामध्ये जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख