शिवसेनेची मुलूखमैदान तोफ नितीन बानगुडे विधान परिषदेत? : राज्यपालांकडे बारा नावे सुपूर्त - three leaders from Mahvikas Aghadi submits names for mlc seats | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेची मुलूखमैदान तोफ नितीन बानगुडे विधान परिषदेत? : राज्यपालांकडे बारा नावे सुपूर्त

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

राज्यपाला नावांना मंजूरी देणार की संघर्ष उभा करणार याची आता उत्सुकता...

मुंबई : राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नेमावयच्या नावांचे गुपित अजूनही कायम आहे. राज्य मंत्रीमंडळाने मंजूर केलेली बारा नावे ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे बंद लिफाफ्यातून दिली. राज्यपाल जेव्हा हा बंद लिफाफा उघडतील व या नावांना मंजूरी देतील, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.

परब यांनी नावे जाहीर केली नाहीत पण मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावाचा यात समावेश आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर यांच्या नावांची शिफारस करण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे यांचे नाव असल्याचे कळते. गेले काही दिवस या नावांची माध्यमांतून चर्चा आहे. त्यात बानगुडे यांची नव्याने भर पडली आहे. याशिवाय विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी यांचेही नाव असू शकते.

परब यांच्यसह  वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक हे तिघे जण आज सायंकाळी सहा वाजता राज्यपालांना भेटले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना परब यांनी सांगितले की सर्व कायदेशीर बाजूंची पूर्तता करून हे पत्र आणि शिफारस केलेली नावे राज्यपालांकडे दिली आहेत. ही नावे राज्यपाल मंजूर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही नावे राज्यपालांनी नामंजूर केली तर, या प्रश्नावर हा जरतरचा प्रश्न आहे. त्यामुळे तो आताच विचारण्यात अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या नावांवरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप नेत्यांचे आणि राज्यपालांचे या मुद्यावरून फिक्सिंग झाल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यामुळे राज्यपाल काय करणार याची उत्सुकता आहे.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख