पंढरपुरात उद्यापासून तीन दिवस संचारबंदी..?

वारी काळात शहरात गर्दी होवू नये, यासाठी 30 जून रोजी दुपारी दोन ते 2 जुलैच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहर व परिसरातील 10 किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करावी, अशा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे पाठविण्यात आला आहे
Pandharpur29.
Pandharpur29.

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. वारी काळात शहरात गर्दी होवू नये, यासाठी 30 जून रोजी दुपारी दोन ते 2 जुलैच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहर व परिसरातील 10 किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करावी, अशा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी पंढरपूर शहरात 29 जून ते 2 जुलै अशी चार दिवसांची संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर वारकरी आणि पंढरपुरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत संचारबंदीचा कालावधी कमी करावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनाने नव्याने अडीच दिवसांचा प्रस्ताव पाठवला आहे. नव्या प्रस्तावामध्ये 30 जूनच्या दुपारी 2 वाजल्यापासून ते 2 जुलैच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहर व परिसरातील 10 किलोमीटर परिसरात संचार बंदी लागू करण्यात यावी, असा प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मंगळवार (ता.30) पासून संचारबंदी लागू होण्याची शक्यता आहे. एक दिवसाने संचारबंदी कमी केल्याने पंढरपूर शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यामधून या निर्णयाचे स्वागत केले.
 
38 भाविकांना पाठवले परत

आषाढी यात्रेचा सोहळा रद्द करण्यात आला असला तरी राज्यभरातून अनेक भाविक पंढरीकडे येत असल्याचे दिसू लागले आहेत. भाविकांनी पंढरीत येवू नये, असे पोलिस प्रशासनाने आवाहन केले असले तरी काही भाविक कळसाचे दर्शन घडावे, या भावनेने पंढरीकडे येत आहेत. आज दिवसभरात पोलिसांनी चेक नाक्यावर तपासणी करताना जवळपास 38 भाविक आढळून आले आहेत. या भाविकांचे पोलिसांनी चांगल्या प्रकारे प्रबोधन करुन त्यांना परत पाठवण्यात पोलिसांनाही यश आले आहे. हे वारकरी चेक नाके चुकवून आड मार्गाने पंढरीत प्रवेश करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच अशा वारकऱ्यांना अडवून त्यांना परत पाठवले जात आहे. अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचार्यांनी सुरु केलेले वारकऱ्यांचे प्रबोधन उपयोगी पडू लागले आहे.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुका पंढरपूरला आषाढी वारीसाठी आषाढ शुद्ध दशमीला म्हणजेच 30 जून रोजी शिवनेरी बसद्वारे पोलिस बंदोबस्तात नेण्यात येणार आहेत. या पालखीसोबत वीस व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. या पादुका ने-आण करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर असणार आहे. देहू येथे ज्येष्ठ वद्य सप्तमीला (ता. 12 जून) जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा, तर आळंदीत माउलींच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा ज्येष्ठ वद्य अष्टमीला (ता. 13 जून) राज्य सरकारच्या आदेशानुसार मोजक्‍या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर तुकोबांच्या पादुका देहूत, तर माउलींच्या पादुका आळंदी येथे ठेवण्यात आल्या आहेत. 

एक जुलै रोजी आषाढी एकादशी असून संतांच्या पादुका पंढरपुरात पांडुरंगाच्या भेटीसाठी येत असतात. दरवर्षी संतांच्या पालख्या पायी पंढरपूला जात असतात. या वर्षी या पादुका शिवशाही बसच्या माध्यमातून नेण्यात येणार आहेत. या पादुकांसोबत जास्तीत जास्त वीस व्यक्तींना राहता येणार आहे. प्रवासात पादुका कोठेही थांबणार नाहीत, याची दक्षता घेण्यास पत्रातून सांगण्यात आले आहे. शिवशाही बस तीस जून रोजी सायंकाळी सहापर्यंत पादुका पंढरपूरला पोच करणार आहे. सरकारकडून आलेल्या पत्रानंतर आळंदी देवस्थानने पंढरपुरातील आषाढी एकादशी (ता. 1 जुलै) सोहळ्याला जाण्याची तयारी सुरू केली आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com