मुख्यमंत्र्यांचा सिद्धूंना बाऊंसर; 'आप'चे तीन आमदार फोडून नेतृत्वालाही इशारा - Three AAP MLA Joined congress in Punjab in presence of CM Amrinder Singh | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचा सिद्धूंना बाऊंसर; 'आप'चे तीन आमदार फोडून नेतृत्वालाही इशारा

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 जून 2021

अमरिंदर सिंग  आणि काँग्रेसचे नेते नवजोत सिंग सिद्धू यांच्यात जोरदार शीतयुध्द सुरू आहे.

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder singh)  आणि काँग्रेसचे नेते नवजोत सिंग सिद्धू (Navjot singh  Sidhu) यांच्यात जोरदार शीतयुध्द सुरू आहे. हा कलह दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी सिद्धू यांच्यासह इतर नाराज मंत्री व आमदारांचे म्हणणे पक्षांतर्गत समितीने जाणून घेतले. आज मुख्यमंत्री या समितीसमोर आपली बाजू मांडणार आहेत. (Three AAP MLA Joined congress in Punjab in presence of CM Amrinder Singh)

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत जाण्यापूर्वी आपचे तीन आमदार काँग्रेस पक्षात आणले आहेत. या आमदारांना पक्षात घेतल्यानंतर ते दिल्लीकडे रवाना झाले. त्यांचं हे पाऊल सिद्धू यांच्यासाठी थेट इशारा असल्याची चर्चा सुरू आहे. आपचे नेते सुखपाल सिंग खैरा, जगदेव सिंग कमलू आणि पिरामल सिंग धौला यांना पक्षात प्रवेश केला. त्यांना आपमधून निलंबित करण्यात आलं होतं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर तिघांना प्रवेश देण्यात आला. 

हेही वाचा : गौतम गंभीर अडचणीत; उच्च न्यायालयाचे कारवाईचे आदेश

पंजाब काँग्रेसच्या ट्विटरवरूनच ही माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये तिघांसह मुख्यमंत्र्याचे छायाचित्रही आहे. या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री दिल्लीला समितीसमोर उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या अध्यक्षतेखाली तिघांची समिती त्यांचे म्हणणे ऐकून घेईल. नाराज आमदारांनी सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुढची निवडणूक जिंकू शकणार नाही, अशी तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. त्यावरून पंजाब काँग्रेसमध्ये कलह सुरू झाला असून सिद्धू हे त्याचे नेतृत्व करत असल्याची चर्चा आहे. 

मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच सिद्धू हे आपमध्ये जाणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. सिद्धू यांनीही त्यांना प्रत्यूत्तर देत हे सिद्ध करण्याचे खूले आवाहन दिले होते. दोन दिवसांपूर्वी सिद्धू यांनी समितीसमोर आपली बाजू मांडली आहे. त्यांनीही थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत कार्यपध्दतीवर टीका केली आहे. 

समितीसमोर आपले म्हणणे मांडल्यानंतर सिद्धू म्हणाले, मी इथे पंजाबच्या लोकांचा आवाज पोहचवायला आलो आहे. पंजाबमधील सत्य परिस्थिती मी सांगितली आहे. पंजाबच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण व्हायला हव्यात. सत्याचा कधीच पराभव होत नाही. आम्हाला पंजाबला जिंकायचं आहे. पंजाबविरोधातील प्रत्येक शक्तीचा पराभव होईल.

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख