नाना पटोलेंची सूचना अमित शहांना मान्य : अंबानींना धमकी, मनसुख हिरेन खून तपासाबाबत मोठा निर्णय

महाराष्ट्रातील तीन घटनांचा तपास हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थांकडे
ambani house
ambani house

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटके भरलेली गाडी ठेवून त्यांना धमकाविण्याच्या केसचा तपास हा राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपविण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. राज्य सरकारवर ही केंद्र सरकारने कुरघोडी केल्याचे मानले जात आहे. ही स्फोटके ज्यांच्या गाडीत ठेवण्यात आलेली होती त्या मनसुख हिरेन यांचाही खून झाल्याने त्यांचीही केस आता NIA कडे जाणार काय, याची उत्सुकता आहे.

हसमुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकऱणावरून विधीमंडळात भाजप आणि सत्ताधाऱ्यांत जोरदार खडाजंगी झाली होती. या केसचा तपास `एनआयए`कडे देण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटिवार यांनी केली होती. राज्य पोलिसांवर दबाव असल्याने तसेच मुंबईतील पोलिस निरीक्षक सचिन वाझे हे हिरेन यांना भेटल्याने या केसचा तपास योग्य होणार नसल्याची भूमिका फडणवीस यांनी मांडली. त्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोध केला. शिवसेनेचे नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी तुम्ही महाराष्ट्र पोलिसांवर अविश्वास का दाखवता, असा सवाल केला. या वेळी सभागृहात बोलताना काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारने या आधी कोरेगाव-भीमा येथील दंगलीचा तपास स्वतःहून एनआयएकडे सोपविला. आताही तसेच करा, अशी उपरोधिक सूचना केली होती.

नानांच्या या सूचनेवर तेव्हाच फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले होते. `नाना हे माझे चांगले मित्र आहेत. ते मला अडचणीच्या काळात चांगला सल्ला देतात. त्यांच्या या सल्ल्यानुसार आम्ही तशी मागणी केंद्र सरकारकडे नक्की करू, असे म्हणत त्यांचे आभार मानले होते. त्यानंतर दोनच दिवसांत हा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

या आधी अभिनेता सुशांतसिंह रजपूत याच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे केंद्र सरकारने सोपविला होता. त्याला राज्य सरकारचा विरोध होता. कोरेगाव भीमा येथील दंगल तसेच पुण्यातील एल्गार परिषदेचा तपास महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर तो एनआयएकडे देण्यात आला होता. त्यासही महाविकास आघाडी सरकारचा विरोध होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com