चाललयं काय? राऊत गेल्यानंतर सौमेय्या भेटले...नंतर नार्वेकरांनी राजभवन गाठले!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आस्थेवाईकपणे सर्व पक्षांतील नेत्यांशी सध्या चर्चा करत आहेत. राज्यातील प्रमुख तीनही पक्षांचे नेते त्यांना भेटून गेले.
narvekar-somaiya
narvekar-somaiya

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियांरीची आज भेट घेतली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील भेटले. मात्र त्या आधी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही राज्यपालांशी चर्चा केली. या तीनही भेटींची छायाचित्रे माध्यमांत प्रसिद्ध झाली. राजभवनावर नेत्यांची एवढी रिघ का, अशी शंकाही उपस्थित झाली.

यातील काही नेत्यांना खुद्द कोशियारी यांनी निमंत्रण दिले होते. त्यांची सक्रियता हा आता चर्चेचा विषय बनली आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर मुकाबला करण्यासाठी ही खलबते सुरू असावीत, असाही तर्क लावण्यात येत आहे. मात्र हा तर्कच आहे. 

या साऱ्या भेटींमध्ये शनिवार व रविवारी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी प्रकाशात न आलेल्या भेटीही घेतल्याचे सत्य समोर येते आहे .या भेटीत सर्वाधिक महत्वाची मानली जाते ती भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांना मिळालेले निमंत्रण. सोमैया यांनी उद्धव ठाकरेंवर सातत्याने आरोप केले आहेत. शिवसेनेचाही त्यांच्यावरील राग शांत झालेला नाही.  संजय राऊत यांच्या 23 मे रोजीच्या भेटीनंतर लगेचच सोमैया यांची त्याच दिवशी भेट का झाली? की तो योगायोग होता की कसे, याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर लगेचच  शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही राजभवन गाठले होते.

आमदार म्हणून निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पण गेल्या आठवड्यात राज्यपालांना भेटले होते. त्यानंतर राज्यपालांनी कोरोनाच्या स्थितीचा राज्यातील आढावा घेण्यासाठी बैठक बोलविली होती. त्याला मात्र ठाकरे गेले नाहीत. तेथे मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. त्यावरूनही चर्चा रंगल्या होत्या. ठाकरे, राऊत, पवार व राणे यांच्यासोबतच्या अधिकृत भेटींची, बैठकींची छायाचित्रे राजभवनने त्यांच्या अधिकृत ट्विटवर हॅंडलवरून दिली होती. सोमेैय्या यांनी या भेटीची माहिती जाहीर केली. 

संजय राऊत राज्यपालांना अगदी नम्रेतेने भेटले. राज्यपालांबद्दल ते गेल्या महिन्यात व्यक्त करत असलेल्या चिडचि़डीचा मागमूसही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. ही भेट झाल्यानंतर राज्यपाल आणि ठाकरे यांचे पितापुत्राचे नाते असल्याचे सांगत आणखीनच कडी केली. आमच्यात दऱ्या वगैरे काही पडत नाही, असे माध्यमांनाच उलट सांगितले.

शरद पवार यांची भेट ही सौहार्दपूर्ण वातावरणात झाली. त्यानंतर राणे यांनी राज्यपालांच्या भेटीत ठाकरे यांच्यावरील राग काढला व ठाकरे यांना सरकार चालविता येत नसल्याचे सांगत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. राजभवन सध्या भेटीचे आणि बातम्यांचे केंद्र बनले आहे, हे नक्की!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com