...म्हणून अजितदादांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं! - for these reason ajit pawar avoided to become deputy CM | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

...म्हणून अजितदादांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं!

योगेश कुटे
मंगळवार, 13 एप्रिल 2021

राजकारणात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाही, हे अजितदादांना 2010 मध्ये कळून चुकले. पाॅलिटिकल किश्श्यांची अशी ही सफर

देशाचे आर्थिक इंजिन असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्यासाठी प्रत्येक छोट्या-मोठ्या नेत्याचे जिवापाड प्रयत्न सुरू असतात. आमदार झाले तर एखादे मंत्रीपद तरी मिळावे म्हणून नंतर ही नेतेमंडळी मग कामाला लागतात. मंत्री झालेले मग चांगले खाते मिळण्यासाठी चकरा मारतात. मंत्र्याला उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री व्हायची संधी मिळाली तर तो सोडेल का? पण एखादे पद मिळूनही दोनदा तीनदा नाकारण्याचे काम  अजित पवार यांनी केले. हे पद होते राज्याचा उपमुख्यमंत्री. अजितदादांना राज्याचे उपमुख्यमंत्री व्हायचे नव्हते. खरेच व्हायचे नव्हते. पण नंतर ते तब्बल चार वेळा या पदावर गेले. हे असे का घडले, हा रंजक इतिहास आहे.

अजित पवार हे आपल्या स्पष्टपणेसाठी प्रसिद्ध आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर कामातही त्यांचा मोठा सहभाग आहे. मंत्री म्हणून प्रशासनावर पकड आहे. राज्यात 1999 मध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थापना झाली. पण तरी ते पक्षाच्या पहिल्या फळीतील नेते नव्हते. त्या वेळी पक्षाच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, विष्णुअण्णा पाटील, पद्मसिंह पाटील यांचीच नावे  होती. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आर. आर. पाटील, जयंत पाटील हे दुसऱ्या फळीतील नेते समजले जात होते. 1999 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला काॅंग्रेससोबत सत्तास्थापनेची संधी मिळाली. शरद पवार यांनी नव्या पिढीतील नेत्यांना जाणीवपूर्वक संधी दिली. हेच नेते मग कालांतराने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे चेहरे बनले. 

छगन भुजबळ राष्ट्रवादीचे पहिले उपमुख्यमंत्री

राष्ट्रवादी काॅंग्रेसला 1999 मध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली तेव्हा पक्षाकडे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. काॅंग्रेसला जास्त जागा मिळाल्या असल्याने त्या पक्षाचे विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीचे क्रमांक दोनचे नेते तेव्हा छगन भुजबळ हेच होते. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद मिळाले. तेव्हा अजित पवार यांना जलसंपदा (कृष्णा खोरे), फलोत्पादन अशी खाती होती. गृह, अर्थ, ऊर्जा अशा ताकदवान खात्यांना इतर मंत्री होते. 2003 मध्ये भुजबळ यांचे उपमुख्यमंत्रीपद गेले. एका टिव्ही चॅनेलवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आणि गृहमंत्री म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्या वेळी पण अजित पवार यांची या पदासाठी चर्चा झाली नाही. गृहखाते हे आर. आर. पाटलांकडे गेले.

पण त्यानंतर 2004 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली. पक्षाच्या उमेदवारी निवडीत लक्ष घातले आणि आपले म्हणून काही तरुण आमदार निवडून आणले. 74 जागा जिंकून क्रमांक एकचा पक्ष राष्ट्रवादी ठरला. काॅंग्रेसला यापेक्षा दहा जागा कमी होत्या. आपल्याला काॅंग्रेसपेक्षा जास्त जागा मिळतील, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री हा काॅंग्रेस पक्षाचाच असेल, असे राष्ट्रवादीचे नेते पत्रकार परिषदांत सांगत होते. मात्र प्रत्यक्षात वेगळेच घडले आणि राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची संधी मिळाली. पण पक्षाने काही दिवस ताणून अखेर तीन खाती जास्त घेऊन मुख्यमंत्रीपद काॅंग्रेसकडे ठेवले. त्याच वेळी अजितदादांना मुख्यमंत्रीपद पक्षाकडे आले तर आपल्याला संधी मिळू शकते, असे वाटत होते. मात्र पक्षाने उपमुख्यमंत्रीपदावरच समाधान मानल्याने त्यांचा नाईलाज झाला.

आर. आर. पाटलांच्या गळ्यात माळ

त्याच वेळी अजितदादांनी उपमुख्यमंत्री व्हावे, असा त्यांच्या समर्थक आमदारांचा प्रयत्न सुरू झाला. पण तेव्हाही त्यांनी आपल्याला उपमुख्यमंत्रीपद नको, असे म्हणत आपल्या समर्थक आमदारांची ताकद आर. आर. पाटील यांच्यामागे उभी केली आणि आर. आर. हे पक्षाचे विधीमंडळ नेतेे आणि उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर आर. आर. यांचे पद गेले. तेव्हाही अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनण्याची संधी चालून आली. पण तेव्हाही त्यांनी फारशी उत्सुकता दाखवली नाही. त्यानंतर पुन्हा या पदाची माळ छगन भुजबळ यांच्या गळ्यात पडली. विलासराव देशमुख जाऊन अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

अजित पवार हे राष्ट्रवादीच्या मंत्र्यातील क्रमांक एकचे असलेले उपमुख्यमंत्री हे पद का स्वीकारत नाही, असा प्रश्न त्यांना 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी विचारला असता त्यांनी भारी उत्तर दिले होते.

महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री बनलेला नेता हा मुख्यमंत्री बनत नाही. म्हणून मला उपमुख्यमंत्री व्हायचे नाही, असे अजितदादांनी सांगितले.

अजित पवार यांनी दिलेले उत्तर अजूनही बरोबर आहे. राज्याचा राजकीय इतिहासच असा आहे की उपमुख्यमंत्री पदावर बसलेली मंडळी मुख्यमंत्री होऊ शकली नाहीत. नाशिकराव तिरपुडे हे राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते. वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळातील फटकळ मंत्री म्हणून त्यांची ओळख नाही. त्यांच्यानंतर सुंदरराव सोळंके, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर. आर. पाटील आणि खुद्द अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. या सर्व नेत्यांत मुख्यमंत्री होण्याची क्षमता आणि धमक होती. पण ती त्यांना मिळाली नाही. त्यामुळे अजित पवार यांचा हा गैरसमज 2010 पर्यंत कायम राहिला.

राष्ट्रवादीने नंबर एकचे पद मागितलेच नाही...

राज्यात 2009 च्या विधानसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसला सत्ता स्थापनेची संधी मिळाली. राष्ट्रवादी काॅंग्रेसने या वेळी मुख्यमंत्रीपद हे अडीच वर्षांचे करून घ्यावे, असा अजितदादांचा आग्रह होता. त्यासाठी ते काही दिवस रूसलेही होते. सर्व गजबजाटापासून ते दूर गेले होते. ते अचानक नाॅटरिचेबल झाल्याने तेव्हा मोठी चर्चा झाली. पण राष्ट्रवादी काॅंग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळू शकले नाही. ते काॅंग्रेसकडेच कायम राहिले. त्या वेळी पण अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदी फारशी उत्सुकता दाखवली नाही आणि पुन्हा ती माळ छगन भुजबळ यांच्या गळ्यात पडली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याने अशोक चव्हाण हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीने 2004 मध्ये क्रमांक एकचा पक्ष म्हणून हट्टाने घेतलेली तीन खाती पुन्हा काॅंग्रेसकडे गेली.

आता हे तरी पद घ्या....

अशोक चव्हाण यांना आपले पद पाच वर्षे राहील, असा विश्वास वाटू लागलेला असतानाच 2010 मध्ये आदर्श इमारतीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण उदभवले आणि चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला.  त्यामुळे पुन्हा नव्याने मंत्रीमंडळ करावे लागले. काॅंग्रेसने मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची निवड केली. त्या वेळी अजित पवार समर्थकांनी उपमुख्यमंत्री बदलावा म्हणूनही मोहीम चालू केली. मुख्यमंत्रीपद मिळेल तेव्हा मिळेल पण आता उपमुख्यमंत्रीपद तरी घ्या, असे या समर्थक आमदारांनी त्यांना समजाविले. इकडे छगन भुजबळ हे आपले उपमुख्यमंत्रीपद कायम राहील, अशा समजात होते. केवळ मुख्यमंत्री बदलला जाणार असल्याचे ते ठामपणे मिडियाला सांगत होते. प्रत्यक्षात राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्रीही बदलायचा निर्णय घेतला. हे पद अखेर अजित पवारांनी स्वीकारले आणि ते चार वर्षे (मध्ये दोन महिन्यांचा राजीनामा) उपमुख्यमंत्री म्हणून राहिले. 

अजित पवार यांचा समज तर खरेच ठरला आणि राज्यात आतापर्यंत एकही उपमुख्यमंत्री हा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. सगळे आपल्या मनाप्रमाणे राजकारणात घडत नाही. सत्ता महत्वाची असते, हे अजित पवारांना कळून चुकले. त्यामुळे मग भाजपसोबत पहाटेचा शपथविधीही उपमुख्यमंत्री म्हणून घेतला. फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री हे सरकार चार दिवसही टिकले नाही. या सरकारला बहुमत मिळाले नाही. उद्धव ठाकरे हे नंतर मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्याही मंत्रीमंडळात एक महिन्याच्या विलंबाने अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. आपल्या या `पराक्रमावर` अजित पवार अधुनमधून खूष असतात. `कसे का असेना हा पठ्ठ्या चार वेळा उपमुख्यमंत्री झाला होता की नाही, असा प्रश्न त्यांनी थेट सभेतच विचारला होता. या प्रश्नावर ते स्वतः हसले होते आणि समोरचे पब्लिकही. उपमुख्यमंत्रीपद नको ते चार वेळा त्याच पदाची शपथ, असा अजितदादांचा हा प्रवास झाला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख