`उद्धव ठाकरे यांनी अपमानित होऊन राजीनामा देण्यापेक्षा मोदींकडे जावे`

भाजपने आता ठाकरे सरकारविरोधात जोरदार मोहीम सुरू केल्याचे दिसून येत आहे...
thackrey-chandrakant Patil
thackrey-chandrakant Patil

कोल्हापूर ः जिल्हा प्रशासनाच्या `हम करेसो कायदा` या वृत्तीमुळेच कोल्हापूर जिल्हा कोरोनाच्या अभुतपूर्व अशा संकटात उभे असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले. यापुढे असा कायदा परवडणारा नाही. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करावे. आम्ही विरोधक असलो तरी तुमच्या सोबत तयार आहेत, असे त्यांनी नमूद केले. सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले," लॉकडाऊननंतर मोठ्या संख्येने लोक कोल्हापुरात येतील. याचा अंदाजच प्रशासनाला आला नाही. त्याची तयारी झाली नाही. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढती आहे. कोणत्याही जिल्ह्याचा पालकमंत्री हा त्या जिल्ह्यासाठी एक प्रकारे मुख्यमंत्री असतात तर जिल्हाधिकारी हे सचिव असतात. जसे राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि कारभार मुख्य सचिव अजय मेहता चालवतात तसे. मुंबई, पुण्याच्या लोकांनी कोल्हापुरात येऊ नये असे म्हणणे चुकीचे आहे. गावात शाळा उभी राहाण्यासाठी, मंदीर उभाराहाण्यासाठी मुंबई, पुण्याचे लोक चालतात. मग आत्ताच ते नकोसे का झाले? ते येतच राहणार. त्यांची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. गेल्या दोन महिन्यात आमदारांची एकही बैठक झाली नाही. अन्य लोकप्रतिनिधींनाही प्रक्रियेत सामावून घेतलेले नाही. त्यामुळे आता तरी हम करो सो कायदा ही वृत्ती सोडून तालीम-संस्था, मंडळे यांना क्वारंटाईन सेंटरची जबाबदारी द्या. आम्ही विरोधक असलो तरी जे जे सहकार्य हवे आहे ते करायला तयार आहे.``

राज्य सरकारच्या कारभाराबाबत टीका करताना ते म्हणाले, "राज्याचा विचार करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य चालवत नाहीत तर मुख्य सचिव अजय मेहता राज्या चालवतात. कोणत्याही लढाईत कप्तान हा फिल्डवर असावा लागतो. मात्र उद्धव ठाकरे मातोश्री आणि कार्यालयात बसून कारभार करतात. साठ दिवसात त्यांनी एकाही रुग्णालयाला भेट दिली नाही. कप्तानच घरी बसत असेल तर ज्या आमदारांना तीन लाख मतदारांनी निवडून दिले ते ही अशाच पद्धतीने शांत बसतील एकही आमदार रस्त्यावर दिसला नाही. राज्यात उद्धव ठाकरे हे कसे कोरोनाचे संकट हातळण्यात फेल गेले यासाठी आता छुप्या पद्धतीने रणनिती सुरू झाली आहे. सत्ता ही फेविकॉल सारखी असते कोणत्याही माणसाला त्याला चिकटून रहावेसे वाटते. ठाकरे यांनी अपमानित होऊन राजीनामा देण्यापेक्षा त्यांनी सन्मानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सद्यस्थितीची माहिती देऊन रिकामे व्हावे.``

रेल्वे तिकिटाबद्दलचा वाद निरर्थक आहे असे सांगून पाटील म्हणाले, तिकीटाच्या 85 टक्के रक्कम रेल्वेने आणि 15 टक्के रक्कम संबंधीत राज्य सरकारने द्यावे असे ठरले होते. महाराष्ट्रात मात्र मजुरांकडूनच तिकीटाचे पैसे घेतले गेले. अशा प्रकारे ज्यांचे पैसे घेतले ते आता तरी परत द्या. केंद्र सरकारने आपतकालीन स्थितीसाठी सोळाशे कोटी रुपये दिले. 458 कोटी केवळ आरोग्याच्या सुविधेसाठी दिले. मुख्यमंत्री निधीमध्ये सातशे कोटी रुपये जमा झाले. ते नेमके कोठे आहेत ते दाखवा. मुळ तिजोरीत हात घालायचा नाही. त्याचा हिशोब द्यायचा नाही आणि वर केंद्राकडून सातत्याने मदतीची अपेक्षा करायची हे योग्य नाही.

कागलात बसून माझ्या नावाने का ओरडता
मी कोथरुडचा आमदार असल्यामुळे तेथील प्रश्‍नावर मला लक्ष द्यावे लागते. कोल्हापुरच्याही मी सातत्याने संपर्कात असतो. कोरोनासारख्या संकटात आम्ही अग्रेसर आहोत. आता तर 81 वॉर्डात कोणत्याही डॉक्‍टरांकडे रुग्ण गेल्यास त्याचे बिल आमच्याकडे पाठवावे. इतके सुक्ष्म काम आम्ही करत आहोत. मात्र कागलमध्ये बसून आमच्या नावाने ओरड का करता, असा सवाल पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारला. ज्या लक्ष्मी दर्शनाचा उल्लेख मुश्रीफ सातत्याने करतात त्यांनीही तसा प्रयोग करावा. त्यासाठी स्वतःच्या खिशातील पैसे देण्याचे धाडस असावे लागते. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करण्याकडे मुश्रिफ यांनी अधिक लक्ष द्यावे. असा टोला त्यांनी लागावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com