ठाकरे सरकारचा एनसीबीच्या कामात हस्तक्षेप.. खासदार नवनीत राणा यांचा आरोप  - Thackeray government's interference in the work of NCB  Navneet Rana allegation | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरे सरकारचा एनसीबीच्या कामात हस्तक्षेप.. खासदार नवनीत राणा यांचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

अमली पदार्थ विरोधी विभागाच्या (एनसीबी) कामात ठाकरे सरकार हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाच्या (एनसीबी) कामात ठाकरे सरकार हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखती त्या बोलत होत्या. 

बॅालीवुडमधील अनेक कलाकारांचा ड्रग्जशी संबध असल्याचा आरोप सध्या होत आहे. अनेक कलाकारांचे नाव समोर येत आहे. तर काहींना एनसीबीनं त्यांना चैाकशीसाठी नोटिस पाठविली आहे. राज्यातील महत्वाच्या मुद्यावरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी राज्य सरकार या ड्रग्ज प्रकरणाकडं सगळ्याचं लक्ष वळवित असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. 

सुशांतची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीत तिने बॉलीवूडमधील कलाकारांची नावे उघड केली आहेत. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, राकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. एनसीबीचे पथक सारा आणि श्रद्धाच्या घरी पोचले आहे.

पथकाने या दोघींना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. एनसीबीचे पथक आता इतर अभिनेत्रींच्या घरी जाऊन त्यांना समन्स बजावणार आहे. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. 

याचबरोबर दीपिकाची मॅनेजर करिष्मा प्रकाश आणि केडब्लूएएन टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपकर यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, करिष्मा प्रकाश हिने तब्येत बरी नसल्याचे कारण देऊन चौकशीला हजर होण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख