मोजणी पूर्ण होईपर्यंत मतमोजणी प्रतिनिधीने हाॅल सोडू नये : तेजस्वी यांच्या सूचना - tejaswi suggets do not leave counting hall till counting complete | Politics Marathi News - Sarkarnama

मोजणी पूर्ण होईपर्यंत मतमोजणी प्रतिनिधीने हाॅल सोडू नये : तेजस्वी यांच्या सूचना

अमोल कविटकर
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

साठ जागांवर एक हजारपेक्षा कमी मतांचा फरक असल्याने तेथील चित्र कधीही बदलण्याची शक्यता

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीतील निकालाची रंगत आणि चुरस वाढत आहे. दुपारी चारपर्यंत भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही बहुमताच्या दिशेन, असे चित्र असले तरी अधिकृत निकाल लागेपर्यंत अनेक घडामोडी होणार आहेत. त्यात अनेक उमेदवारांच्या मतांमध्ये फारच कमी फरक आहे. त्यामुळे पारडे कधीही बदलेल, अशी शक्यता आहे. 

त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाने आपल्या कार्यकर्त्यांना मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नये, अशा सूचना दिल्या आहेत. `हम सभी क्षेत्रों के उम्मीदवारों और कार्यकर्ताओं से संपर्क में है और सभी जिलों से प्राप्त सूचना हमारे पक्ष में है। देर रात तक गणना होगी। महागठबंधन की सरकार सुनिश्चित है। बिहार ने बदलाव कर दिया है। सभी प्रत्याशी और काउंटिंग एजेंट मतगणना पूरी होने तक काउंटिंग हॉल में बने रहें।` असे पक्षाने म्हटले आहे. यामुळे तेजस्वी यादव यांना अद्याप विजयाचा विश्वास असल्याचे दिसून येत आहे.

भाजप हा राज्यात सध्या सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. एनडीए आघाडीवर असली तरी निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास विलंब होत असल्याने कोणताही राजकीय पक्ष अद्याप जल्लोष करताना दिसत नाही. मतमोजणीला विलंब होण्याचे कारण कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. 

मतमोजणीत दुपारी साडेचारनंतर एनडीएला एकूण 131 जागांवर आघाडीवर आहे. एनडीच्या जागा सहाने वाढलेल्या दिसत आहेत. याचवेळी महाआघाडी 102  जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडीच्या जागा आठने कमी झालेल्या आहेत. यात जेडीयूला सर्वाधिक फटका बसला आहे. जेडीयू  46 जागांवर आघाडीवर आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या 72 जागा होत्या. भाजप 77 जागा, राष्ट्रीय जनता दल 65, काँग्रेस 19, लोक जनशक्ती पक्षाला एक जागा असा कल दिसत आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मतमोजणीवर परिणाम झाल्याचे पहिलेच उदाहरण बिहारमध्ये घडत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या वेळी मतमोजणी केंद्रांची संख्या दुपटीने वाढवण्यात आली आहे. मात्र, मतमोजणी टेबलांची संख्या तेवढीच ठेवण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरक्षित अंतर राखण्यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांची संख्या 72 हजार 723 वरुन 1 लाख 6 हजार 515 वर नेण्यात आली आहे. 

मतमोजणीचे 35 फेऱ्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे दुपारनंतर स्पष्टपणे कल दिसू शकेल. आज दुपारी 12.15 वाजेपर्यंत केवळ 15 टक्केच मतांची मोजणी झाली होती, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. 

जेडीयूचे नेते पक्षाच्या जागा कमी झाल्याचे मान्य करीत असले तरी ब्रँड नितीशला धक्का पोचला नसल्याचे सांगत आहेत. दुय्यम स्थानी असलेला भाजप आता पहिल्या स्थानी पोचल्याचे चित्र आहे. याचवेळी राज्यात जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.  भाजपला जास्त जागा पदरात पडतील असे चित्र असून, नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदी कायम राहतील का, याबाबत भाजपच्या गोटातूनच साशंकता व्यक्त केली जात आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी या प्रकरणी सूचक वक्तव्य केले आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेमुळे या निवडणुकीत आम्ही तरलो. सरकार स्थापना आणि नेतृत्वाच्या निर्णयावर सायंकाळपर्यंत निर्णय जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार राहणार हे आधीच ठरलेले असताना आता नेतृत्वाची चर्चा कशाला असा प्रश्न विचारला जात आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख