'महात्मा फुले जनआरोग्य' नाकारणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई करा... - Take action against the hospital which denies Mahatma Phule Janaarogya | Politics Marathi News - Sarkarnama

'महात्मा फुले जनआरोग्य' नाकारणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई करा...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

पुणे जिल्ह्यासह राज्यातही या योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रमाण नगण्य असून, त्यासाठी रुग्णालयांकडून या योजनेअंतर्गत मोफत उपचारांसाठी केली जाणारी टाळाटाळ हे प्रमुख कारण आहे. 

पुणे : राज्यात कोविड-१९ या साथरोगाची परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य ते गरजूंना सर्व आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी सरकारतर्फे महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येत आहे. पण पुणे विभागात काही रूग्णालय ही योजना नाकारत आहेत. त्यामुळे योजनेतील लाभार्थ्य़ांचे हाल होत आहेत. पुणे जिल्ह्यासह राज्यातही या योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रमाण नगण्य असून, त्यासाठी रुग्णालयांकडून या योजनेअंतर्गत मोफत उपचारांसाठी केली जाणारी टाळाटाळ हे प्रमुख कारण आहे. 

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जोतिबा फुले जनआरोग्य योजना नाकारणाऱ्या रूग्णांबाबत तक्रार केली आहे. रुग्णांना शासकीय योजनेचे लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सर्व हॉस्पिटल व्यवस्थापकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विकास लवांडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन लवांडे यानी पवार यांना दिले आहे. येत्या शुक्रवारी याबाबत पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

याबाबत कोव्हीड वॉर मॅनेजमेंट हेल्पलाईन वर केवळ पोस्टमनची भूमिका करीत असल्याचा आरोप लवांडे यांनी केला आहे. विमा कंपन्याचे पूर्ण सहकार्य मिळत नाही. काही हॉस्पिटलमध्ये आधी पैसे भरून घेतले जातात व विमा रक्कम मंजुरीनंतर रुग्णाला पैसे परत करू असे सांगितले जाते, याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, रुग्णांची ससेहोलफट होऊ नये, असे लवांडे यांनी सांगितले.

संबंधित हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेची पूर्ण माहिती ठळक स्वरूपात दर्शनी भागावर लावण्यात यावी, प्रत्येक सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण हक्क सनद ठळक फलकावर लावावी, उपचारा बाबत अवाजवी बिल आकारणीच्या तक्रारीबाबत शासकीय नियुक्त निरीक्षक व लेखापरीक्षक यांचे मोबाईल क्रमांक रुग्णाला सहज उपलब्ध होतील, याबाबत आवश्यक योग्य ती सुविधा करावी, उपचाराबाबत शासकीय दरपत्रक इंग्रजी व मराठीत रुग्णालयात दर्शनी भागावर ठळक फलकावर लावावे, जिल्हा स्तरावर याबाबत रुग्णांच्या सहकार्यासाठी स्वतंत्र कक्ष असावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.   

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका व आधार कार्ड आवश्यक आहे. कारोना साथरोगाच्या उद्रेकानंतर राज्यातील सर्व नागरिकांना 'एमजेपीजेएवाय' योजनेंतर्गत मोफत उपचार देण्याची घोषणा सरकारने केली. या योजनेंतर्गत मोफत उपचारांचा लाभ घेण्याची मुदत सरकारने आता ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे. 
 
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे दोन लाख ४४ हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (एमजेपीजेएवाय) आतापर्यंत सुमारे आठ हजार १२५ करोनाबाधितांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे करोनाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत अवघ्या सव्वातीन टक्के करोनाबाधितांनाच या योजनांचा लाभ मिळाला असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख