एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या केली असती तर... - Swapnil Lonakar's mother said angrily | Politics Marathi News - Sarkarnama

एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या केली असती तर...

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 4 जुलै 2021

जगात काय चालले याचे यांना काही देणेघेणे नाही, फक्त राजकारण आणि राजकारण.

पुणे : राज्य लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा देऊनही नोकरी मिळत नाही, त्यामुळे यात पडू नका. जमले तर हे इतरांपर्यंत पोचवा, अनेक जीव वाचतील, असा उल्लेख करीत स्वप्नील लोणकर (Swapnil Lonakar) याने आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या केली असतीतर, त्यांना आत्महत्येचे दुःख काय असते ते समजे असते, अशी संतप्त प्रतिक्रिया स्वप्नीलच्या आईने व्यक्त केली आहे. (Swapnil Lonakar's mother said angrily) 

त्या म्हणाल्या की ''एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या केली असती तर त्यांना जाग आली असती की नाही. दुसऱ्याच्या जीवाचा सुद्धा विचार करावा. आज आमच्यावर काय परिस्थिती आली. आम्ही त्याला मोठे केले त्याला शिकवले. आज नोकरी मिळण्या आधीच सरकारने त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. फक्त यांची भांडणे, जगात काय चालले याचे यांना काही देणेघेणे नाही, फक्त राजकारण आणि राजकारण. माझा मुलागा माझ्याशी बोलत होता. तो म्हणायचा आई माझी मुलाखत झाली नाही. गरीबांच्या मुलांचे यांना काही देणेघेणे नाही. त्यांची मुले आहेत सुरक्षीत, आशा शब्दात त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. 

हेही वाचा : ...म्हणून मी गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड टाकला

दरम्यान, स्वप्नील लोणकर हा एमपीएससीची 2019 ची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला होता. मात्र, गेल्या दीड वर्षापासून त्याची मुलाखत झाली नव्हती. त्यामुळे तो तणावात होता.  त्याने 2020 मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली होती. ती पूर्व परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता. मात्र, कोरोनामुळे मुख्य परीक्षा झाली नव्हती. एमपीएसीसीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने तो तणावात होता.

घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असूनही कुटुंबीयांना आर्थिक हातभार लावू शकत नाही, या तणावातून स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. त्यामुळे ‘एमपीएससी’च्या परीक्षा व नोकऱ्यांबाबतच्या राज्य सरकारच्या चालढकलीच्या भूमिकेवर आता प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. 

हेही वाचा : भापजची खेळी फेल करण्यासाठी ठाकरे सरकारचा हा प्लॅन

आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्वप्नील लोणकर याने म्हटले आहे की, कोरोना नसता आणि सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असल्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असते. हवे ते, ठरवले ते प्रत्येक साध्य झाले असते. मी घाबरलो, खचलो मुळीच नाही, फक्‍त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता. अशा शब्दांत त्याने आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख