नितीन गडकरी यांच्या घरासमोर स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन सुरू.. - Swabhimani agitation starts in front of Nitin Gadkaris house. | Politics Marathi News - Sarkarnama

नितीन गडकरी यांच्या घरासमोर स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन सुरू..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्यात येत आहे. आज सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. 

बुलढाणा  : विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्यात येत आहे. आज सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. 

नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर, स्वाभीमानी संघटना विदर्भाचे अध्यक्ष दामोदर इंगोले व विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दिवाळी साजरी करून मोदी सरकारचे लक्ष वेधण्यात येत आहे. अकोला येथे केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे व जालना येथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना किमान हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, त्यासाठी केंद्र सरकारने भरीव पॅकेज द्यावे, हमीभावाने कापूस खरेदी करण्यासाठी तालुकानिहाय CCI चे कापूस खरेदी केंद्र दिवाळीपूर्वी सुरू करावे, सोयाबीनचा प्रति क्विंटल किमान 6000 रु भाव स्थिर करण्यासाठी धोरण आखावे, पिकविमा कंपन्यांना शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी केंद्र सरकारने बाध्य करावे, केंद्राने आणलेले कृषी विधेयके रद्द करावे, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.

हेही वाचा  : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाचे एक हजार कोटींचे पॅकेज
 
मुंबई  : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण  वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येत आहे अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री. परब म्हणाले, ''एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच भूमिका होती त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री   अजित पवार यांच्या सोबत बैठक झाली. आणि यावर मार्ग काढण्यात आला आहे. शासनाकडून एसटीसाठी पुढील सहा महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून  एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे,''

''टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतुक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली. आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे  आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल. शासनाकडून ही आता आर्थिक मदत मिळाल्याने एसटीच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे  असल्याचेही श्री. परब यांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख