सुशीलकुमार मोदी यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी.. - Sushilkumar Modi has an important responsibility at the center | Politics Marathi News - Sarkarnama

सुशीलकुमार मोदी यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

सुशील कुमार यांना केंद्रात एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मोदी यांना उपमुख्यमंत्री करू नये, असे पक्षातील त्यांच्या विरोधकांना वाटत आहे.   

नवी दिल्ली :  बिहारच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा नितीशकुमार हेच असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी तारकिशोर प्रसाद यांची निवड करण्यात आली आहे.  नितीश कुमार यांचे कट्टर समर्थक असलेल्या सुशील कुमार यांना यंदा उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपने पक्षाच्या गट नेतेपदी तारकिशोर प्रसाद यांची निवड केल्याने तेच  उपमुख्यमंत्री होतील, असा अंदाज आहे. सुशील कुमार यांना केंद्रात एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मोदी यांना उपमुख्यमंत्री करू नये, असे पक्षातील त्यांच्या विरोधकांना वाटत आहे.   

‘एनडीए’च्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. आज  (ता. १६)  मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा शपथ घेणार आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत १२५ जागा जिंकलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) विधीमंडळ नेतेपदी नितीश कुमार यांची रविवारी एकमुखाने निवड झाली. ‘एनडीए’च्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. आज सायंकाळी साडेचार वाजता ते मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा शपथ घेणार आहेत. 

संरक्षण मंत्री व पर्यवेक्षक राजनाथसिंह, बिहारमधील भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी नितीश कुमार यांच्या निवासस्थानी ‘जेडीयू’, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम), विकासशील इन्सान पार्टीच्या (व्हीआयपी)आमदारांची बैठक घेऊन ‘एनडीए’च्या नेतेपदी नितीश कुमार यांची निवड केली. नितीश कुमार यांनी त्यानंतर राज्‍यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. राजभवनाबाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नवीन सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार असल्याचे सांगितले. ‘एनडीए’तील चारही घटक पक्षांकडून त्यांना समर्थनपत्र देण्यात आले.

बिहार विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलाला (जेडीयू)४३ आणि भाजपला ७४ जागा मिळाल्या. ‘जेडीयू’ला कमी जागा मिळाल्याने नितीश कुमार यांनी ‘एनडीए’च्या बैठकीत भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, अशी विनंती केली. ‘भाजपने सरकार स्थापन करावे. ‘जेडीयू’चे त्याला समर्थन असेल,’ असा प्रस्तावही त्यांनी ठेवला. पण राजनाथसिंह यांच्यासह भाजप नेत्यांनी तो अमान्य करीत नेतेपदी नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कोमोर्तब केले. भाजप आमदारांच्या गटाच्या नेतेपदी तारकिशोर प्रसाद यांची तर उपनेतेपदी रेणू देवी यांची निवड करण्यात आली. प्रसाद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते आहेत. 
 
नितीश कुमार यांचे सहकारी असलेले उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांची उपमुख्यमंत्रिपदी पुन्हा निवड होणार याबद्दल राजनाथसिंह यांना विचारले असता ‘वेळ आल्यावर सांगू’, असे सांगत याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. मोदी यांच्या नावाबाबत भाजपने गुप्तता पाळली आहे. मात्र, ‘‘गेल्या ४० वर्षांत आरएसएस आणि भाजपने त्यांना खूप काही दिले. भविष्यात कार्यकर्त्यांच्या रूपात काम करण्यास त्यांना कोणी रोखू शकणार नाही, ’ असे त्यांनीच ट्विटमध्ये म्हटले  आहे.
  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख