सुशांतची बहीण श्वेता म्हणते, "" महाराष्ट्रात पुन्हा एकदा रामराज्य यावे!''  - Sushant's sister Shweta says, "Let Ram Rajya come to Maharashtra once again!" | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतची बहीण श्वेता म्हणते, "" महाराष्ट्रात पुन्हा एकदा रामराज्य यावे!'' 

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

श्वेतासिंह हिने केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की हे देवा ! हे कसले गुंडाराज सुरू आहे. असला अन्याय अजिबात सहन केला जाऊ नये.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राजपती राजवट लागू व्हावी आणि येथे पुन्हा एकदा रामराज्य यावे अशी अपेक्षा सुशांत राजपूतची बहीण श्वेतासिंह किर्ती हिने म्हटले आहे. 

अभिनेत्री कंगना राणावत हिचे मुंबईतील अनधिकृत घर महापालिकेने पाडल्यानंतर तिच्या मदतील सुशांतसिंहची बहीण श्वेता ही धावून आली. तिने महापालिकेने केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करतानाच ठाकरे सरकारलाही लक्ष्य केले आहे. 

श्वेतासिंह हिने केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की हे देवा ! हे कसले गुंडाराज सुरू आहे. असला अन्याय अजिबात सहन केला जाऊ नये. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली तर या अन्यायाला उत्तर असू शकते का ? चला पुन्हा एकदा महाराष्ट्रात रामराज्य स्थापन करू या! या पोस्टमध्ये कंगनाला श्वेताने समर्थन दिले आहे. कंगनापाठोपाठ श्वेतासिंह किर्तीने ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. 

आमचा काय संबंध : राऊत 
दरम्यान, कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेने कार्यवाही केली, त्यांचा शिवसेनेशी काय संबंध ? असा सवाल शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते आणि मुख्यप्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. 

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना राणावतने शिवसेनेसह बॉलीवूडमधील अभिनेत्यांबरोबर निर्माते आणि दिग्दर्शकांना शिंगावर घेतले आहे. शिवसेना आणि कंगनामध्ये तर दररोज वादविवादाच्या फैरी झडत आहेत. शिवसेनाही तिला जशासतसे उत्तर देत आहे. 

कंगनाने काही दिवसापूर्वी मुंबईची तुलना पीओके केल्यांने मराठी मन दुखावले गेले. तिचा सर्वस्तरावर निषेध केला गेला. त्यानंतर ती जयहिंद जय महाराष्ट्राचा जयघोष देऊ लागली. कंगनाने शिवसेनेविरोधात भूमिका घेतल्याने या पक्षाचे नेते संतप्त झाले आहे. काल तर तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत समाचार घेतला. 

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या पाली हिल येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने काल पाडून टाकले. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कंगनाने पुन्हा मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली होती. यावरुन आता पुन्हा मोठा गदारोळ सुरू झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंगनाचे नाव न घेता खडे बोल सुनावले आहेत. तसेच महापालिकेने घर पाडायला नको होते असेही त्यांनी म्हटले होते. 

कंगनाचे घर पाडल्याप्रकरणी संजय राऊत यांनी आज ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राऊत म्हणतात, की कंगनाचे घर पाडण्याशी शिवसेनेशी काय संबंध ? अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. पत्रकारांनी मुंबईच्या महापौर किंवा महापालिका आयुक्तांशी संवाद साधावा त्यांना प्रश्‍न करावेत. कंगनाचे घर पाडले त्याचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही असेही राऊत यांचे म्हणणे आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख