सुरेश गोरे यांचं राष्ट्रवादीशी वेगळं नातं : अजित पवार  - Suresh Gore's different relationship with NCP: Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

सुरेश गोरे यांचं राष्ट्रवादीशी वेगळं नातं : अजित पवार 

हरिदास कड 
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि प्रदीर्घ काळ सदस्य म्हणून काम केलेल्या गोरे यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आहेत.

चाकण (जि. पुणे) : "पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील आमचे सहकारी, खेड-आळंदीचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे आज सकाळी निधन झाल्याचे समजून धक्का बसला. मागील काही काळापासून ते शिवसेनेत होते. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसशी ते प्रदीर्घ काळ जोडले गेलेले होते. राष्ट्रवादीशी त्यांचं वेगळं नातं होतं,' अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोरे यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

अजित पवार म्हणाले की, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि प्रदीर्घ काळ सदस्य म्हणून काम केलेल्या गोरे यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आहेत. आज आम्ही आमचा जुना सहकारी, पुणे जिल्ह्यानं एक कार्यशील नेतृत्व गमावलं आहे. गोरे कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्‌गती लाभो ही प्रार्थना. 

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही गोरेंना श्रद्धांजली अर्पण केली. त्या म्हणाल्या की, शिवसेनेचे खेडचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन धक्कादायक आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या व्यवस्थेसाठी स्वतः लक्ष घातले होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सातत्याने त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भात संपर्कात होते. परंतु कोरोनाच्या गंभीर संकटासमोर त्यांचा मुकाबला होऊ शकला नाही आणि त्यांचे निधन झाले. 

गोरे यांनी आमदारकीच्या काळासोबतच त्याअगोदरही अनेक वर्षे समाजकार्य केले. जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील अनेक पदे त्यांनी भूषविले होती. महिलांची जागृती करण्यात त्यांचा सहभाग होता. उत्तम चारित्र्य, संवेदनशील स्वभाव, महिला सुरक्षेच्या प्रश्नावर बांधिलकी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत पूर्णपणे वचनबद्धता, शिवसैनिकांबद्दल आधार अत्यंत वेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व अशा मिलाफ त्यांच्या संपूर्ण कामात झालेला होता, अशा भावपूर्ण शब्दांत गोऱ्हे यांनी सुरेश गोरे यांना श्रद्धांजली वाहिली. 

सुरेश गोरे हे माझे राजकीय विरोधक असले तरी त्यांचे व माझे चांगले संबंध होते. त्यांच्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मी मिळवून दिली होती. तालुक्‍यातील एक चांगले व्यक्तीमत्व हरपले आहे. त्यांच्या जाण्याने तालुक्‍याची मोठी हानी झाली आहे. एक संयमी माणूस निघून गेला, याचा मला धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार दिलीप मोहिते यांनी दिली. 

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, सुरेश गोरे माझा एक महत्वाचा माणूस, एक आधार होता. त्यांच्या जाण्याने मला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्युमुळे मी निःशब्द झालो आहे. 

"आमदार असताना सुरेश गोरे यांनी खेड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात विकास केला. त्यांच्या जाण्याने तालुक्‍याची मोठी हानी झाली आहे. तालुक्‍यातील एक संयमी नेतृत्व कायमचे निघून गेले, हे मोठे दुःख आहे,' अशी भावना माजी आमदार राम कांडगे यांनी व्यक्त केली. 

खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर म्हणाले, "माजी आमदार सुरेश गोरे यांच्या निधनाने तालुक्‍याची मोठी हानी झाली आहे. तालुक्‍यातील एक संयमी नेतृत्व गेले. त्यांच्या निधनाने तालुक्‍याला मोठे दुःख झाले आहे.' 

"खेडचे माजी आमदार सुरेश गोरे यांच्या निधनाने तालुक्‍याचे मोठे नुकसान झाले. तालुक्‍यातील एक संयमी नेतृत्व निघून गेले, याचे मोठे दुःख आहे. ही हानी कधीही भरून येणार नाही,' अशा शब्दांत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख