बिबट्याच्या जेरबंदीसाठी सुरेश धसांनी हाती घेतली बंदूक, काठी घेऊन रात्रगस्तीवर

जिल्ह्यातील आष्टी सह गेवराई व इतर काही तालुक्यांत बिबट्याने दहशत माजविली आहे. दोन दिवसांत आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने दोन बळी घेतले आहेत. बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे.
suresh dhas night patrol
suresh dhas night patrol

बीड : अगोदर आगमनाची चर्चा, नंतर दर्शन आणि आता थेट नरबळी घेणाऱ्या बिबट्यामुळे बीड जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे. विशेषत: दोन बळी घेतलेल्या बिबट्याची सर्वाधिक दशहत आणि भीती आष्टी तालुक्यात असून आता त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग ताकदीने मैदानात उतरला आहे. विशेष म्हणजे वनविभागाच्या जवानांसोबत भाजप आमदार सुरेश धसही हाती बंदूक आणि काठी घेऊन रात्रीच्या गस्तीवर होते.

जिल्ह्यात आष्टी तालुक्यात मागच्या काही दिवसांपासून बिबट्याचे अधुन - मधून दर्शन झाले. त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली. सोशल मिडीयावरुनही बिबट्या दर्शनाचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले. मात्र, वनविभागाने  गाढ झोप काढली.  त्यांच्या झोपेमुळे मागच्या तीन दिवसांत आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने दोघांचा बळी घेतला. सुरडी (ता. आष्टी) येथील पंचायत समिती सदस्यपती नागनाथ गर्जे हे दुपारच्या वेळी पिकांना पाणी देत असताना बिबट्याने हल्ला करुन त्यांना ठार मारले. त्यानंतर दोन दिवसांनी शुक्रवारी पुन्हा आष्टी तालुक्यातीलच किन्ही येथे आजोळी आलेल्या स्वराज भापकर या नऊ वर्षीय बालकाला मानवी वस्तीतून लोकांसमक्ष उचलून नेऊन ठार केले. त्यामुळे या भागात बिबट्याची मोठीच दहशत निर्माण झाली आहे.

शेतात वेचणीला कापूस आलेला असला तरी बाहेर पडण्याची कोणाची हिंमत होत नाही वा पाणी असूनही पिकांना देण्यासाठी जाण्याचे धाडस कोणी करत आहे. दरम्यान, या दोन बळीनंतर वनविभागाला जाग आली आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अमरावती, नाशिक व औरंगाबाद येथील वनविभागाच्या जनावांचा जत्था शुक्रवारी रात्री घटना घडलेल्या सुरडी व किन्ही या गावी पोचला. गोळीच्या माध्यमातून देणाऱ्या गन असलेले जवान रात्री पोचले. मात्र त्यांच्या जेवणाची अडचण होती. मात्र, भाजप आमदार सुरेश धस यांनी तत्काळ या जवानांच्या जेवणाचा बंदोबस्त केला. लोकांमध्ये भीती असल्याने जवारांनी रात्री गस्त सुरु केली. सुरेश धसही जवानांसोबत हाती गन आणि काठी घेऊन त्यांच्यासोबत मैदानात थांबले. जिथे सामान्यांचा प्रश्न असतो तिथे प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचा तसा धसांचा हातखंडाच आहे. मग, रात्रीच्या वेळी ऊसतोड मजूरांना अडचण आली तरी गुन्हा अंगावर घेऊन परजिल्ह्यात जावे लागू कि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रानावनात भटकावे लागो, धस मात्र मैदानात असतातच हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com