सुप्रिया सुऴे, श्रीरंग बारणे यांचा मोदी सरकारवर हल्ला.. - Supriya Sule Shrirang Barne joint attack on Modi government | Politics Marathi News - Sarkarnama

सुप्रिया सुऴे, श्रीरंग बारणे यांचा मोदी सरकारवर हल्ला..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

संसद अधिवेशनात पहिल्याच दिवशी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र सरकारपुढे कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा मुद्दा उपस्थित केला. राज्याच्या प्रश्नावर एकत्रितपणे आक्रमक राहण्याचे संकेत दिले

नवी दिल्ली : संसद अधिवेशनात पहिल्याच दिवशी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र सरकारपुढे कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा मुद्दा उपस्थित केला. राज्याच्या प्रश्नावर एकत्रितपणे आक्रमक राहण्याचे संकेत दिले. यात शिवसेनेने कोरोना संकट काळात केंद्राकडून महाराष्ट्राला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा हल्ला चढविताना जीएसटीचा प्रलंबित निधी केंद्राकडून कधी मिळणार अशी विचारणा केली.

शून्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आर्थिक संकट आणि बेरोजगारीवरून सरकारला जाब विचारताना अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी याच गंभीर विषयांवर चर्चा अपेक्षित असल्याचे सुचविले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की आज देशासमोर अर्थव्यवस्थेचे संकट आणि बेरोजगारीचे सर्वात मोठे आव्हान आहे. महाराष्ट्राचा कोरोनाशी सर्वात कठीण संघर्ष सुरू असून आर्थिक आघाडीवरही मोठे आव्हान आहे. यावर मात करण्यासाठी राज्याकडून केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती, बेरोजगारी यावर संसदेत चर्चा करण्यास सरकारचे प्राधान्य हवे, असे खासदार सुळे म्हणाल्या. कोरोनाचा फटका भारताप्रमाणेच जगातील सर्व अर्थव्यवस्थांना बसला आहे. यामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी सरकारकडून उपाययोजना अपेक्षित आहेत. परंतु तसे होताना दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

तर, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना संकट असताना केंद्राकडून अपेक्षित सहकार्य राज्याला मिळत नसल्याचा हल्ला चढवला. जीएसटीची पूर्ण रक्कम अद्याप महाराष्ट्राला मिळालेली नाही. केंद्राला मिळणाऱ्या करापैकी सर्वाधिक कर महाराष्ट्रातून वसूल होतो. असे असताना महाराष्ट्राची मागणी केंद्र सरकारने अजूनही पूर्ण केली नसल्याची नाराजी व्यक्त करताना जीएसटी रक्कम लवकरात लवकर केंद्राने द्यावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

 Edited  by : Mangesh Mahale

हेही वाचा : राज्यसभेत पुन्हा हरिवंश; वरिष्ठ सभागृहावर सरकारची पकड घट्ट
 
मुंबई : राज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार व संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते हरिवंशसिंह यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार व राष्ट्रीय जनता दलाचे (जेडीयू) नेते मनोज झा यांचा पराभव केला आहे. राज्यसभेतील सरकार आणि विरोधकांच्या नेमक्या ताकदीचा अंदाज या निवडणुकीने आला आहे. राज्यसभेवरील सरकारची पकड आता आणखी घट्ट झाल्याचे या निवडणुकीने समोर आले आहे. राज्यसभा उपसभापतिपदासाठी मनोज झा हे विरोधी पक्षांचे उमेदवार होते. त्यांच्यासमोर एनडीएचे उमेदवार हरिवंशसिंह यांचे आव्हान होते. उपसभापतिपदाचा हरिवंशसिंह यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपल्याने हे पद रिकामे झाले होते. आता यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आजच निवडणूक झाली. या निवडणुकीत अखेर हरिवंश यांनी बाजी मारली आहे. आज दुपारी 3 नंतर राज्यसभेचे कामकाज सुरू झाले. राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या नेमक्या ताकदीचा अंदाज या निवडणुकीने येणार असल्याने ती महत्वाची बनली होती.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख