पवार कृषीमंत्री असताना एकही आंदोलन का झालं नाही..सुळेंचा मोदींना प्रश्न - Supriya Sule questions pm Narendra Modi about agriculture law | Politics Marathi News - Sarkarnama

पवार कृषीमंत्री असताना एकही आंदोलन का झालं नाही..सुळेंचा मोदींना प्रश्न

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या  टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.

मुंबई : "कृषी कायद्यातील सुधारणांवर शरद पवारांसह काँग्रेसच्या नेत्यांनी भाष्य केलं. पण कृषी कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांनी अचानक यु टर्न घेतला," अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केली होती. मोदींनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.
 
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आमच्या पक्षाच्या प्रमुखांवर मोदींनी टीका केली. त्यावेळी मी उभं राहून त्यांना थांबवू शकली असती, पण ती आमची संस्कृती नाही. मोदी हे देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांनी सभागृहात मांडलेले विषय गांर्भीर्यानं घेण्याची गरज आहे. मी पवारांची बाजू मांडत नाही, तेवढी क्षमता त्यांच्याकडे आहे. पण मला काही तथ्य मांडायचं कारण पंतप्रधानांनी त्यांचं नाव घेतलं." 

मोदींनी यु टर्न हा शब्द वापरला. याबाबत सुळे म्हणाल्या, "मला यु टर्नबाबत सांगायचे आहे. बदल झाला पाहिजे यावर आमचा विश्वास आहे. आम्ही आधार, मनरेगा, आरटीआय, अन्न सुरक्षा, शिक्षण हक्क, अशी अनेक विधेयकं आणली. सर्वांशी चर्चा करुन ही विधेयकं आणण्यात आली. मग कायदे करण्यात आले. मनरेगामुळे नोकरी गेलेल्यांना रोजगार मिळाला. आधारलाही विरोध करण्यात आला होता, आणि आज ते जीएसटी, मनरेगा, आधारवरुन आपली पाठ थोपटत आहे. आता हा नेमका कोणता टर्न आहे मला माहिती नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी जीएसटी विधेयक आणलं होतं. त्यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध केला होता.

"शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्राचा मोदींनी दाखला दिला. मात्र, यावेळी त्यांनी राज्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे अमलबजावणी केली जावी हे वाचलं नाही," असे सुळे म्हणाल्या. 
"पवारांनी त्यावेळी कायदा बदलण्याची शिफारस केली होती. तोच मार्ग या सरकारने का निवडला नाही. जर हे पत्र सर्व मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं तर मग शरद पवार कृषीमंत्री असताना एकही आंदोलन का झालं नाही.," असे सुळे म्हणाल्या    

"कृषी कायद्यातील सुधारणांवर शरद पवारांसह काँग्रेसच्या नेत्यांनी भाष्य केलं. पण कृषी कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांनी अचानक यु टर्न घेतला," अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  राज्यसभेत केली होती "चुक झाली तर माझ्या माथी, चांगलं झालं तर त्यांचे श्रेय तुम्ही घ्या. शेतकरी आंदोलन संपवा..." असे मोदी यांनी सांगितले होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख