परमबीरसिंह यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका   - Supreme Court refuses to hear Parambir Singh' petition | Politics Marathi News - Sarkarnama

परमबीरसिंह यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका  

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 जून 2021

तुम्ही इतकी वर्षे पोलिस दलात कार्यरत आहात.

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी नव्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या विविध चौकशा राज्याबाहेरील यंत्रणांकडून कराव्यात, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिली. 

न्यायालयाने म्हटले की, तुम्ही इतकी वर्षे पोलिस दलात कार्यरत आहात. आता तुम्हाला राज्याबाहेर तुमची चौकशी हवी आहे, असे म्हणता येणार नाही. तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात, आपल्याच राज्याच्या कारभारावर विश्वास ठेवा, असेही न्यायलयाने सांगितले. त्यामुळे राज्य सरकाला मोठा दिलासा मिळाला आहे. आता परमबीरसिंह यांची चौकशी राज्यातील यंत्रणेलाच करता येणार आहे. 

हे ही वाचा : आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होती; पिंजऱ्यातील नव्हे: चंद्रकांतदादांचा शिवसेनेला चिमटा

दरम्यान, परमबीरसिंह (Parambir Singh) यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तीन तक्रारींप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गोपनीय चौकशी (डिसक्रीट इन्कायरी) करण्यात सुरवात केली असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले होते. पोलिस निरीक्षक बी.आर. घाडगे, अनुप डांगे व व्यावसायिक सोनू जालान यांनी केलेल्या तक्रारींमध्ये परमबीरसिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप केला आहे. याप्रकरणावरही परमबीरसिंग यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

उच्च न्यायालयानंतर परमबीरसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्याविरोधात सुरू करण्यात आलेल्या चौकशा महाराष्ट्राबाहेरील यंत्रणांकडून करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. ही सुनावणी न्यायमूर्ती सरन व न्यायमूर्ती गवई यांच्या खंडपीठासमोर होणार होती. पण या सुनावणीतून गवई यांनी अंग काढून घेतले होते. त्यामुळे या याचिकेवर गवई यांचा समावेश नसलेल्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

हे ही वाचा :  राष्ट्रवादीच्या घड्याळातील काटा हा दहा वाजून दहा मिनिटांवरच का?

पोलिस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाला लेखी पत्र लिहून परमबीरसिंग यांच्याविरोधात बेकायदा कृत्य व भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपये कमवल्याचा आरोप केला होता. 14 पानी या पत्राची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, महासंचालक कार्यालय व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांना पाठवण्यात आले होते. पत्रात घाडगे यांनी परमबीरसिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना श्रीमंत व्यक्तींची नावे विविध गुन्ह्यातून काढण्यासाठी बेकायदेशिरित्या आदेश दिल्याचा आरोप केला होता. तसेच डांगेच्या तक्रारीतही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्याशिवाय व्यावसायिक सोनू जलाननेही त्याच्या तक्रारीत जबरदस्तीने पैसे घेण्यात आल्याचे आरोप केले होते. त्याप्रकरणी आता एसीबी अधिक चौकशी करत आहे.   

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख