अन्वय नाईक आत्महत्येची सखोल चौकशी होणार : अनिल देशमुख - suicide of Anvay Naik to be probed says home minister Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

अन्वय नाईक आत्महत्येची सखोल चौकशी होणार : अनिल देशमुख

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी अत्यंत अवमान करणारे शब्द वापरल्याचा दाखला देत सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला होता.

मुंबई : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कलमानुसार कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत केली. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत अन्वय नाईक यांच्या आत्महत्येसंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही घोषणा केली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी अत्यंत अवमान करणारे शब्द वापरल्याचा दाखला देत सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. या मागणीला संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी पाठिंबा देताना पत्रकार गोस्वामी हे न्यायाधीश व साक्षीदाराची भूमिका बजावत असल्याचा टोला लगावला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही या हक्कभंगाला पाठिंबा दिला. गोस्वामी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचे सांगताना याच गोस्वामीमुळे एका वास्तुविशारदाने आत्महत्या केल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची चौकशी कोणी दडपली, असा सवाल करत गोस्वामी सुपारीबाज पत्रकार असल्याची टीका भुजबळ यांनी केली. दरम्यान, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी हक्कभंगप्रकरणी योग्य कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
----
अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीने अन्वय नाईक यांचे 80 लाखांचे बिल दिले नाही म्हणून नाईक यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी अन्वय यांची पत्नी अन्वा नाईक या चौकशीसाठी उपोषणालाही बसल्या होत्या; मात्र तत्कालीन गृहमंत्र्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.
- सुनील प्रभू, आमदार
---
विरोधकांचा गोंधळ
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सत्ताधारी सदस्यांकडून संताप व्यक्त होत असतानाच भाजपचे आमदार मात्र गदारोळ करत होते. सत्ताधारी सदस्यांच्या या चर्चेत घोषणाबाजी करत व्यत्यय आणत होते. पुरवणी मागण्यांची चर्चा सुरू करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत होते. या गोंधळामुळे सभागृह तीन वेळा तहकूब करावे लागले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख