लोकलेखा समितीची सूत्रे सुधीर मुनगंटीवार यांच्या हाती  - Sudhir Mungantiwar as the Chairman of the Public Accounts Committee | Politics Marathi News - Sarkarnama

लोकलेखा समितीची सूत्रे सुधीर मुनगंटीवार यांच्या हाती 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

लोकलेखा समिती ही राज्य विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त समिती आहे.

मुंबई : विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी माजी अर्थमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली. 

माजी वित्त व नियोजन मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या लोकलेखा समितीच्या सदस्यपदी माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री आशिष शेलार, जयकुमार रावल, विनय कोरे, संजय सावकारे यांचा समावेश आहे. 

लोकलेखा समिती ही राज्य विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त समिती आहे. विधिमंडळाच्या कामकाजात या समितीचे विशेष महत्त्व आहे. राज्याचे विनियोजन लेखे व नियंत्रक तसेच महालेखापरीक्षकांचा अहवाल यांचे परीनिरीक्षण करणे. राज्य सरकारच्या वित्तीय लेख्यांचे व त्यावरील लेखा परीक्षा अहवालाचे परिनिरीक्षण करणे, राज्याची महामंडळे, व्यापारविषयक व उत्पादनविषयक योजना आणि प्रकल्प यांचे उत्पन्न व खर्च दाखवणारी लेखा विवरणे तसेच एखादे विशिष्ट महामंडळ, व्यापारी संस्था किंवा प्रकल्प यांना भांडवल पुरविण्यासंदर्भात नियमन करणाऱ्या वैधानिक नियमांच्या तरतुदीअन्वये तयार केलेला ताळेबंद व नफा-तोट्याच्या लेख्यांची विवरणे व त्यावरील नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा अहवाल तपासणे. 

राज्यपालांनी कोणत्याही जमा रकमांची लेखा परीक्षा करण्याबाबत किंवा साठा व मालासंबंधीचे लेखे तपासण्याबाबत नियंत्रक व महालेखापरीक्षकांना निर्देशित असेल, त्या अहवालाचे परीक्षण करणे ही लोकलेखा समितीची प्रमुख कर्तव्ये आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख