भरणेंनी उजनीचे पाणी पळवल्यास जनआंदोलन करणार...सुभाष देशमुखांचा इशारा - Subhash Deshmukh warns Guardian Minister Dattatraya Bharane | Politics Marathi News - Sarkarnama

भरणेंनी उजनीचे पाणी पळवल्यास जनआंदोलन करणार...सुभाष देशमुखांचा इशारा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 मे 2021

पालकमंत्र्यांनी सत्तेचा दुरूपयोग करू नये.

सोलापूर : दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व आहे. त्यांनी उजनीच्या पाण्याबाबत सोलापुरात एक आणि इंदापुरात एक व्यक्तव्य करू नये. हे त्यांना शोभत नाही. पालकमंत्र्यांनी सत्तेचा दुरूपयोग करू नये. त्यांनी जर उजनीचे पाणी इंदापूरला पळवण्याचा प्रयत्न केला तर जे पक्ष, नेते येथील त्यांच्यासोबत किंवा नागरिकांना घेऊन आपण स्वतः जनआंदोलन उभारू आणि आगामी अधिवेशानात याबाबत आवाज उठवू, असे रोख ठोक प्रतिपादन माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

विकास नगर येथील संपर्क कार्यालयात आयोजित वार्तालापप्रसंगी देशमुख बोलत होते. सोलापूरचे पाणी नेणार नाही, असा शब्द पालकमंत्र्यांनी दिला आहे. त्यांनी तो शब्द पाळवा. उजनीच्या पाण्यासाठी पुणे आणि सोलापूर अशी लढाई करण्याचा प्रश्‍न नाही. ज्याच्या त्याच्या हक्काचे पाणी त्याला मिळाले पाहिजे. सत्तेचा कोणीही दुरूपयोग करू नये. सत्ता जात येत असते. भरणे हे इंदापूरचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी इंदापूरसाठी नक्की झटावे. मात्र त्यांच्याकडे सोलापूरचे पालकत्व दिले. सोलापूरचे पाणी हिसकावून नेणे त्यांना न शोभणारे आहे.  त्यांनी पळवण्याचा प्रयत्न केला तर आपण गप्प बसणार नाही. जनआंदोलन उभारू, अधिवेशनात आवाज उठवू मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांना उजनीचे पाणी इंदापूरला नेऊ देणार नाही, असे देशमुख म्हणाले.

देशमुख म्हणाले की, हे जगावर, देशावर आलेले संकट आहे. सर्वांनी एकत्र येऊन त्यासाठी लढले पाहिजे. केंद्र सरकार आपल्यापरीने मदत करत आहेत. राज्य सरकारनेही त्यांचे काम करावे. केंद्राकडून जास्तीज जास्त लसीचा साठा महाराष्ट्राला झाला आहे, त्यामुळेच राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. उगाच कोणी  विरोधाला विरोध म्हणून राजकारण करू नये. 1 मे पासून 18 वर्षापुढील सर्वांना लस देण्याचे नियोजन आहे. सर्वांनी यात उस्फूर्त सहभाग नोंदवावा. लस घेतल्याने कोरोनाच्या महामारीला थोडाफार अटकाव येणार आहे. सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालक करावे आणि  सोलापुरातून कोरोनाला हद्दपार करावे, असे आवाहनही  देशमुख यांनी केले.
 
औषध, लसीबाबत सोलापूर जिल्ह्यावर अन्याय
केंद्राने औषध, लसी, इंजेक्शनचा साठा राज्याला दिला आहे. राज्याने विभागाला दिला आहे. आपला पुणे विभागात येतो. तेथूनच सोलापूर शहर आणि जिल्ह्याला लस, औषधे देण्यात अन्याय होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अशा संकटाच्या काळात राजकारण करणे बरोबर नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. सोलापूरला जास्तीत जास्त लस मिळाव्या यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख