पुणे : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निकाल लागत आहेत. महाविकास आघाडीने बहुतांश ठिकाणी आघाडीवर आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव निश्चित केला. लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टि्वट करून महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या टि्वटमध्ये अनिल देशमुख म्हणतात, "पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात स्पष्ट कौल देणाऱ्या महाराष्ट्रापुढं आम्ही नतमस्तक आहोत. सत्तेत राहण्यासाठीचे गणित आम्ही वर्षापूर्वीच जुळवले; आता भरभक्कम लोकसमर्थनही मिळवले. कालही आम्ही जनतेपुढे विनम्र होतो, आजही आहोत आणि सदैव राहु. महाविकासआघाडीच्या विजयी शिलेदारांचे अभिनंदन."
पुणे पदवीधर मतदारसंघातून पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यावर आघाडी घेतली आहे. लाड यांना सुमारे 10 हजार मतांची आघाडी असल्याची माहिती आहे. कॉंग्रेसचे जयंत आसगावकर हे शिक्षक मतदारसंघातून सुमारे चार हजार मतांनी पुढे असल्याची माहिती आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी झाले आहेत. चव्हाण यांनी सलग पाचव्या फेरीत आपली आघाडी कायम राखत भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा तब्बल 57 हजार 895 मतांनी धुव्वा उडवला. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी आघाडीवर आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात असगावकर आघाडीवर; कोटा पूर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीक्रमाची मोजणी
#PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/gAiJ6IElOz
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 4, 2020
हेही वाचा : मुख्यमंत्री अबोल असले तरी चतुर : शरद पवारांचे उद्धव ठाकरेंना सर्टिफिकेट
मुंबई : मुख्यमंत्री अबोल असले तरी चतुर आहेत, त्यांनी तीन पक्षांचे सरकार यशस्वीपणे चालवले आहे. हे सरकार पाच वर्ष जनतेसाठी काम करत राहील, हा मला विश्वास आहे, अशी प्रशंसा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना केली. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'महाराष्ट्र थांबला नाही. महाराष्ट्र थांबणार नाही.' या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलताना पवार म्हणाले, "या सोहळ्यास उपस्थित राहताना विशेष आनंद होत आहे. अनेक संकटांमधून मार्ग काढत हा जगन्नाथाचा रथ यशस्वीपणे पुढे घेऊन जाण्याचे काम आपण सर्वांनी केले आहे. शेती आणि शेतकरी संकटात होता, कोरोनाशी लढा सुरू आहे. पण मागील ५० वर्षांमध्ये मी असे कधी पाहिले नाही की, एक वर्ष पूर्ण होताच सरकारच्या कामगिरीची चिकित्सा सुरू झाली. कधी नव्हे ती मिळालेली सत्ता हातातून गेल्यामुळे काही लोक सतत शंका उपस्थित करण्याची भूमिका घेत आहेत. पण सरकारमधील प्रत्येक प्रतिनिधीने आपल्यावरील जबाबदारी चोख पार पाडली आहे. त्यामुळे संकटग्रस्तांना देखील सरकारबाबत विश्वास वाटतो,''

