`.. तर सुशांतसिंह प्रकरणावरून राज्य सरकार बरखास्त होईल एवढे लक्षात ठेवा : भाजपचा इशारा - State govt will be dismissed if Sc orders not followed in Sushantsingh case warns BJP | Politics Marathi News - Sarkarnama

`.. तर सुशांतसिंह प्रकरणावरून राज्य सरकार बरखास्त होईल एवढे लक्षात ठेवा : भाजपचा इशारा

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

सुशांतसिंह प्रकरणी भाजप रोज नवीन इशारे देत आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या पोलिस तपासात कोणालातरी वाचविण्यासाठी संपूर्ण राज्य सरकार काम करीत असल्याची लोकांची भावना आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत, तर राज्य सरकार बरखास्त होईल, एवढे लक्षात ठेवावे, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. 

सुशांतसिंहच्या आत्महत्याप्रकरणी रोजच आरोप- प्रत्यारोप, खुलासे प्रतिखुलासे होत असून आज महापौरांच्या विधानानंतर भाजपनेही पलटवार केला आहे. तसेच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असूनही सीबीआय वा बिहारच्या तपासी अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्याची शिवसेना नेत्यांची धडपड सुरुच आहे, असा आरोपही भाजपने केला आहे.  अशी दडपशाही चालवून घेणार नाही, असेही भाजप नेते सांगत आहेत. पण या वादावादीमुळे यात खरेच कोणालातरी वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे का, तसेच उलटपक्षी कोणाला उघडे पाडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे का, एवढी लपवालपवी सुरु आहे म्हणजे कोठेतरी पाणी मुरते आहे का, अशीही चर्चा लोकांमध्ये असल्याचे मत भातखळकर यांनी व्यक्त केले. 

या तपासासाठी यापुढे मुंबईत येणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येईल, असे विधान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज केल्याचा दावा भातखळकर यांनी केला आहे. मात्र याच प्रकरणाच्या तपासासाठी यापूर्वी मुंबईत आलेल्या बिहारच्या आयपीएस दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तरीही पुन्हा असे करण्याची भाषा बोलणाऱ्या महापौरांचा बोलविता धनी कोण आहे, याची चौकशी करण्याची गरज असल्याचे, भातखळकर यांनी म्हटले आहे. 

ठाकरे सरकारची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे. या तपासात कोणालातरी वाचविण्यासाठी संपूर्ण सरकार काम करत आहे ही जनमानसातील भावना अशा वक्तव्यांनी आणि बेताल कृतीने प्रबळ होईल. अखेर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळणे गरजेचे आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. ते आदेश पाळले नाहीत तर हे सरकार बरखास्त होण्यास वेळ लागणार नाही, एवढेच या मंडळींनी ध्यानात ठेवावे, असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख