state govt issued gr for compulsory Marathi subject for all educations boards | Sarkarnama

सीबीएसई, आयसीएसई शाळांत यंदापासूनच मराठी अनिवार्य : असा आहे आदेश

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 जून 2020

मराठी भाषा अनिवार्य करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती.

पुणे : महाविकास आघाडीने सरकारने सीबीएसई, आयसीएसई, केंब्रिज यासह अन्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा हा विषय सक्तीचा करणारा आदेश आज लागू केला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तो जाहीर केला. 

याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2020-21 पासून लागू होणार आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी मराठा भाषा विषय शिकविला जात नाही, येथे पहिली व सहावीपासून हा विषय यंदापासून हा विषय सक्तीचा होणार आहे. नंतर पुढील वर्षी दुसरी व सातवी, त्यानंतर तिसरी व आठवी असे टप्पे गाठण्यात येतील. दहावीपर्यंत मराठी हा विषय सक्तीचा राहणार आहे. यासाठीची पुस्तके बालभारती तयार करणार आहे.

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू व तेलंगणा या राज्यांच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषा अनिवार्य करताना त्यासाठी पदनिर्मितीस मान्यता देण्यात आलेली नाही. यासाठीच्या सोयी निर्माण करण्याची जबाबदारी संबंधित शाळांवर टाकण्यात आलेली आहे.  परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सवलत अथवा मराठी या विषयातून पूर्णतः सूट देण्याचा अधिकारही शाळांना देण्यात आलेला आहे.

महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर मराठी भाषा अनिवार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. 

...........

ही पण बातमी वाचा : पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जाणे झाले सुकर

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये उद्योग-व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातून मोठ्या संख्येने कामगार तेथे जातात. त्यामुळे त्यांना पासशिवाय ये-जा करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. दोन्ही शहरांतून व्यावसायिकांची आणि माल वाहतुकीचीही ये-जा सुरू झाली आहे. दोन्ही शहरांच्या सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वाहतूक शाखेच्या प्रमुख नीलम जाधव यांनी दिली. 

पुणे, पिंपरी-चिंचवडचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही शहरांच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. राज्य सरकारने दहा दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडचा रेड झोन काढून घेतला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये 26 मे पासून "पीएमपी'ची वाहतूक सुरू झाली आहे.

बोपोडीतील हॅरीस पूल आणि औंधमधील राजीव गांधी पुलावरील वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. दोन्ही पुलांवर पोलिस आहेत. तसेच, रात्री 9 ते पहाटे 5 दरम्यान दोन्ही शहरांत संचारबंदी कायम राहणार आहे. त्याचीही अंमलबजावणी पोलिस करीत आहेत. या शिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची अंमलबजावणी होते की नाही, हेही पोलिस पाहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. 

नीलम जाधव म्हणाल्या की, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरादरम्यानची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दोन्ही शहरांच्या तपासणी नाक्‍यावर पोलिस कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी पोलिस करीत आहेत. तसेच, महामार्गांवरही पोलिस वाहतुकीचे नियमन करीत आहेत. दोन दिवसांपासून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनीही गरजेनुसारच वाहतूक करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 

पुण्यातील वाहतूक शाखेतील सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख म्हणाले,"पुण्यातून पिंपरी-चिंचवडला वाहतूक सुरू झाली आहे. राज्य सरकारने दुचाकीवर एकच व्यक्ती, रिक्षात चालक आणि दोन प्रवासी, मोटारीत चालक आणि दोन प्रवासी, तर लहान मोठ्या बसमध्ये क्षमतेच्या निम्मीच प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. या आदेशाची अंमलबजावणी पोलिस करीत आहेत. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील वाहतुकीवरील निर्बंध कायम आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रातील वाहतूक अद्याप खुली करण्यात आलेली नाही. तेथील निर्बंध कायम आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख