पोलिस भरतीचा निर्णय जाहीर : साडे बारा हजार जागांसाठी परीक्षा घेण्याची गृहमंत्र्यांची घोषणा - state govt announces recruitment for 12500 police posts | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस भरतीचा निर्णय जाहीर : साडे बारा हजार जागांसाठी परीक्षा घेण्याची गृहमंत्र्यांची घोषणा

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

राज्यातील अनेक तरुण या परीक्षेसाठी तयारी करत होते. 

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागातील युवक ज्या घोषणेची वाट पाहत होते ती घोषणा आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  केली. राज्य मंत्रिमंडळाने येत्या आॅक्टोबरमध्ये सुमारे साडे बाराहजार जागांवर पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीमध्ये मराठा आरक्षण लागू होणार की नाही याची आता उत्सुकता आहे. परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. 

राज्यात कोरोनाच्या संकटात पोलिस दलावर मोठा ताण आला आहे. जवळपास दोनशेहून अधिक पोलिस यात मृत्युमुखी पडले आहेत. तसेच अनेक रिक्त जागा असल्याने विद्यमान पोलिसांवरही ताण आला आहे. कोरोनात राज्याच्या महसुलात मोठी घट झाल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांचा पगार करणे सरकारसाठी अवघड झाले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या नोकर भरतीवर बंदी घालण्यात आली होती. पोलिस आणि आरोग्य या दोन खात्यांना फक्त त्यासाठी अपवाद करण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्य बैठकीत पोलिस भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे अनिल देशमुख यांनी  स्पष्ट केले. त्याची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात या जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे अनेकांना सध्याच्या कठीण परिस्थितीत रोजगार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सर्व प्रकारची भरती पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली होती. या भरतीत मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज करण्याची मुभा मिळण्याची शक्यता आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख