हाॅटेल, रेस्टाॅरंट, बार सुरू करण्याच आदेश निघाला : रेल्वे, लोकलला हिरवा कंदिल - State govt allows hotels, restaurantss, bar to open | Politics Marathi News - Sarkarnama

हाॅटेल, रेस्टाॅरंट, बार सुरू करण्याच आदेश निघाला : रेल्वे, लोकलला हिरवा कंदिल

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

अनेक व्यावसायिकांनी हाॅटेल सुरू करण्याची मागणी केली होती. 

मुंबई : कोरोना कंटेन्मेंट झोनव्यतिरिक्त हाॅटेल, फूड कोर्ट, रेस्टाॅरंट आणि बार पाच आॅक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने आज परवानगी दिली. यासाठी काय दक्षता घ्यायची, याची नियमावली पर्यटन विभागामार्फत जारी करण्यात येणार आहे. शाळा, काॅलेज, क्लासेस बंदच राहणार आहेत. लोकलमध्ये डबेवाल्यांना प्रवास करता येणार आहे. त्यासाठी त्यांना क्यू आर कोड देण्यात येणार आहे. पुण्यातील लोकस सेवाही सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

सिनेमा हाॅल, आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, सामाजिक-सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, मेट्रो हे बंदच राहणार आहेत. येत्या 31 आॅक्टोबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. प्रभारी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश आज काढण्यात आले. 

 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत दोन दिवसांपूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये, असे सांगितले होते. हॉटेलचालकांनी व्यवसायासमोरील अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हाॅटेल सुरू करण्याचे संकेत दिले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख