सर्वांसाठी उपनगरी रेल्वे सुरु करा ; भाजपच्या खासदारांची संसदेत मागणी - Start suburban rail for all; Demand of BJP MP in Parliament | Politics Marathi News - Sarkarnama

सर्वांसाठी उपनगरी रेल्वे सुरु करा ; भाजपच्या खासदारांची संसदेत मागणी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

उपनगरी रेल्वेसेवा खुली करा, अशी मागणी आता इशान्य मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांनीच लोकसभेत केली आहे.

मुंबई :  अनलॉकच्या काळात सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रवास सोपा व्हावा, यासाठी उपनगरी रेल्वेसेवा खुली करा, अशी मागणी आता इशान्य मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांनीच लोकसभेत केली आहे. रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी जनतेकडून पूर्वीपासूनच होत आहे, अनेक राजकीय पक्षांनी देखील त्याला पाठिंबा दिला आहे. मात्र, संसर्ग वाढण्याच्या भीतीने राज्य सरकार याला नकार देत आहे. यापूर्वी प्रकाश आंबेडकर तसेच अन्य काही डाव्या नेत्यांनी उपनगरी रेल्वेसेवा खुली करण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर यासाठी नुकतेचं आंदोलनही केले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या या मागणीला विशेष महत्व आहे. यावेळी कोटक यांनी मध्य रेल्वे प्रवाशांच्या समस्याही संसदेत मांडल्या.

मार्च अखेरपासून रेल्वेसेवा बंद आहे, जूनपासून राज्य सरकारने बससेवा सर्वसामान्यांसाठी खुली केली तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष उपनगरी गाड्याही सुरु केल्या. मात्र, आता मॉल, दुकाने, खासगी कार्यालये सुरु झाली तरी उपनगरी गाड्या सुरु न झाल्याने लोकांचे हाल होत आहेत. लोकांचा सारा भार बेस्ट बसवर येऊन तेथे प्रचंड गर्दी होत आहे, असेही कोटक यांनी सांगितलं. त्यामुळे उपनगरी रेल्वेगाड्या सर्वांसाठी खुल्या करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

सुरुवातीला अत्यावश्यक सेवांसाठीच्या सर्व उपनगरी रेल्वेगाड्या जलदगती होत्या व त्या फक्त प्रमुख स्थानकांवरच थांबत होत्या. नंतर पश्चिम रेल्वेने काही जलदगती गाड्या कायम ठेवल्या, पण सर्व स्थानकांवर थांबणाऱ्या काही गाड्यादेखील सुरु केल्या. पण मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर अजूनही बहुतांश गाड्या जलदगती असून त्या सर्व स्थानकांवर न थांबता फक्त प्रमुख स्थानकांवरच थांबतात. भांडूप आणि विक्रोळी ही प्रमुख स्थानके असून अत्यावश्यक सेवा देणारे कित्येक सरकारी कर्मचारी तेथे राहतात. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी उपनगरी गाड्या या स्थानकांवर थांबवाव्यात, अशी मागणीही कोटक यांनी संसदेत केली. त्यामुळे कोविडकाळातही अथकपणे सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना थोडातरी दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले.  

हेही वाचा : मोदींनी 74 टक्के कामगारांना "हायर अँड फायर' केले ! 
 
नाशिक : संसदेत विरोधी पक्ष नसतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर तीन कामगार विधेयके मंजुर करुन घेतली आहेत. त्यानुसार देशातील 74 टक्के कामगार आपला नोकरीचा अधिकार गमावणार आहेत. त्यांना आता "हायर अँड फायर' मध्ये ढकलण्यात आले आहे. कामगारांना संकटात लोटणारी या संहिता राष्ट्रपतींनी स्विकारु नयेत, असे आवाहन "सीटू'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केले आहे. यासंदर्भात आज देशभरात विविध शहरांत आंदोलन करण्यात आले. नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत देखील आंदोलन करुन कामगारांनी केंद्र सरकारचा निषेध केला. या विषयावर सीटू सह सर्व कामगार संघटनांनी देशव्यापी आंदोलनानंतर राष्ट्रपतींना ही मागणी केली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख