माजी मंत्री गिरीश महाजनांकडे एक कोटींची खंडणी मागणारा निघाला एसटी कंडक्टर - st conductor demands Rs one crore ransom from Ex minister Girish Mahajan | Politics Marathi News - Sarkarnama

माजी मंत्री गिरीश महाजनांकडे एक कोटींची खंडणी मागणारा निघाला एसटी कंडक्टर

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

पोलिसांनी शिताफिने लावला आरोपीचा तपास

जामनेर : राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जामनेर येथील सभेत कोपऱ्या-कोपऱ्यामधे बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरामधील ग्लोबल-महाराष्ट्र या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी फडणवीस आले होते. त्या निमीत्ताने आयोजित सभेला बॉम्बने उडवुन देण्याची धमकी देऊन प्रचंड खळबळ उडविणारा आरोपी चक्क  एसटी कंडक्टर निघाला आहे.

अमोल राजू देशमुख असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. त्याला आज (१६ ऑक्टोबर) रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.  त्याला १५ ऑक्टोबर रोजीच रात्री उशीरा त्याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले होते. सायबर गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा आणि जामनेरसह पाचोरा पोलीस ठाण्याची मदत घेण्यात आली.

देशमुख याने गिरीश महाजन यांच्या पीएला फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ती न दिल्यास सभा बाॅंबने उडविण्याची आणि गिरीश महजनांनाही मारण्याची धमकी त्याने दिली होती. 

पोलीस पथकाने सुगाव्यावरून कुऱ्हाड, पाचोरा, पिंपळगांव-हरेश्वर व पहुर परीसरामधे तांत्रिक बाबी शोधुन,वेगवेगळ्या स्थानीक लोकांशी बोलुन आरोपीचा शोध लावला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी "सरकारनामा`शी बोलतांना दिली. पाचोरा विभागाचे उपअधीक्षक ईश्वर कातकडे, निरीक्षक इंगळे, किशोर पाटील, रमेश कुमावत, राहुल पाटील, आसीफ पठाण, प्रितम पाटील, स्थानीक गुन्हे शाखेचे विजयसिंग पाटील, ईशांत तडवी, राहुल बेहरे आदींचा या पथकामधे समावेश होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख