मोदींच्या पुण्यातील त्या भाषणाने मंत्रमुग्ध केलेच पण एका `श्रद्धांजली`ने मने जिंकली... - speech by Modi in Pune enchanted but a 'tribute' won the hearts of rally | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींच्या पुण्यातील त्या भाषणाने मंत्रमुग्ध केलेच पण एका `श्रद्धांजली`ने मने जिंकली...

सूर्यकांत पाठक
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. त्यांच्या आणि पुण्याच्या आठवणी जागवणारा हा लेख.

केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर राष्ट्रप्रेमी नागरिकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वामुळे त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या रूपाने एक सर्व सामान्य घरातला माणूस देशाचा पंतप्रधान झाला ही देशाच्या राजकीय इतिहासातील अलौकिक घटना आहे. गेल्या 42 वर्षांपासून त्यांच्याशी असलेला स्नेह आजही कायम आहे.
 
आदरणीय नरेंद्र मोदींची आणि माझी पहिली ओळख 1978 साली झाली. आणीबाणीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महाराष्ट्र व गुजरात प्रांताचा द्वितीय वर्षाचा संघ शिक्षावर्ग पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागमध्ये झाला. वर्गाचे सर्वाधिकारी अ‍ॅड. दादासाहेब बेंद्रे व मुख्य कार्यवाह कै.गोपाळजी ठक्‍कर होते. एक संघ स्वयंसेवक म्हणून पूर्ण महिनाभर मी त्यांच्या व्यवस्थेत होतो. त्याच वेळी नरेंद्रभाई गुजरातचे प्रचारक या नात्याने संघ शिक्षावर्गात गुजरातच्या संघ स्वयंसेवकांच्या बरोबर उपस्थित होते. पहिली ओळख आमची तेथे झाली.

1989 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवारांची जन्मशताब्दी या निमित्ताने संघ परिवारातील अनेक संस्थांमध्ये डॉ. हेडगेवारांच्या प्रतिमेचे अनावरणाचे कार्यक्रम झाले. पुण्यातील शेवटचा कार्यक्रम ग्राहक पेठेच्या वतीने करण्यात आला. डॉ. हेडगेवारांच्या प्रतिमेचे ग्राहक पेठेत अनावरण करण्यासाठी त्या वेळचे गुजरातचे प्रचारक आणि आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख अतिथी  म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्या वेळचे ‘सकाळ’चे सल्‍लागार डॉ. शरच्चंद्र गोखले होते. कार्यक्रम मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झाला. या निमित्ताने पुण्यात आल्यानंतर संघाप्रचारकाच्या पद्धतीप्रमाणे दोन दिवस माझ्या घरीच राहिले होते. अनेक विषयांवरती माझ्या काही स्वयंसेवक मित्रांबरोबर त्यांच्या गप्पाही त्यावेळी झाल्या आणि आमचा स्नेह अधिक दृढ झाला.

डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीचा पदाधिकारी असताना ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी अनेक वेळी त्यांचा माझा संपर्क होत होता. 1857 चे स्वातंत्र्य संग्रामाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव आणि या ग्रंथाचा शतक महोत्सव तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची 125 वी जयंती आणि हा योग, असा त्रिगुण योग 2007 साली जुळून आला होता. या निमित्ताने ‘1857 चे स्वातंत्र्य समर शतकोत्सव समिती’ स्थापन झाली. या समितीचे अध्यक्ष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व सचिव म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती.  या समितीने ‘1857 चे स्वातंत्र्य समर’ या ग्रंथाची लोकआवृत्ती काढून एक लाख घरांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला होता. ग्राहकहित प्रकाशनातर्फे 450 पानांचे पुस्तक केवळ 60 रूपयांत उपलब्ध करून दिले होते. त्या पुस्तकाचे प्रकाशनाचा कार्यक्रम त्या वेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व राम शेवाळकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रिडा मंदिर येथे पार पडला. एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा इतका भव्यदिव्य कार्यक्रम पुण्यात प्रथमच झाला होता. मोदींच्या ओजस्वी आणि तेजस्वी भाषणाने पुस्तक प्रकाशनाचा हा सोहळा रंगला. आपल्या वाणीने त्यांनी श्रोतुवर्गासमोर 1857 स्वातंत्र्ययुद्धाचे वर्णन करून उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले होते. मोदी हे समोरच्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांच्या वाणीत जोश असतो पण त्यामागे अभ्यासही असतो. त्यात इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय. त्यामुळे या कार्यक्रमात त्यांच्या वाणीला अधिकच बहर आला. एका वेगळ्या समाधानाने श्रोते चिंब भिजून गेले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तर युगपुरूष म्हणून त्यांनी वर्णन केले होते. पण या कार्यक्रमातील महत्त्वाचा प्रसंग घडला तो असा. 

गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेली दंगल आणि मोदी या विषयाची चर्चा तेव्हा जोरात होती. त्याच वेळी ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करत मला नरेंद्र मोदींना गोळ्या घालाव्याशा वाटतात, अशा आशयाचे विधान केले होते. त्यांच्या या विधानाबद्दल तेव्हा बरीच नाराजी व्यक्त झाली होती. पुण्यातील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होण्याच्या काही दिवस आधी तेंडुलकर यांचे निधन झाले होते. मोदींना ही बाब माहीत होती. या कार्यक्रमात भाषणाच्या सुरवातीलाच मोदी यांनी, थोर साहित्यिक विजय तेंडुलकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो,`असे वाक्य उच्चारले. त्यांचे प्रसांगवधान या निमित्ताने अनेकांच्या लक्षात आले.  आपल्या हत्येची इच्छा असणाऱ्याबद्दल सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने आदर व्यक्त केले त्याची चर्चा साहजिकपणे झाली. त्यांच्या या एका वाक्याने श्रोत्यांनीही त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून आला. 

नरेंद्र मोदी हा एक झंझावात आहे. नरेंद्र मोदी हे एक अत्यंत सृजनशील मन आहे. एक विलक्षण बुद्धीमत्ता आहे. आणि त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या देशातल्या गोरगरीब, शोषित-पिडित-वंचित लोकांकरिता त्यांना अद्भूत आत्मियता आहे. त्यांना देशात बदल घडवून आणण्यासाठी पंतप्रधानपदाची संधी मिळाली आहे असे ते मानतात. सत्ता उपभोगण्यासाठी नाही, अशी त्यांची धारणा आहे. खरं तर ते एका अर्थाने उपभोगशून्य स्वामी आहे. संन्यस्त कर्मयेागी आहेत. देशाला नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान मिळाले आहेत हे आपणा सर्वांचे सद्भाग्यच म्हणावे लागेल. आज भारताला सशक्‍त व समृद्ध बनवण्यासाठी अशाच कणखर नेतृत्वाची गरज आहे.

(शब्दांकन ः उमेश घोंगडे)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख