सोनिया गांधींची पंतप्रधान मोदींना भावनिक साद; अनाथ मुलांबाबत केलं आवाहन - Sonia Gandhi makes suggestion to safeguard future of orphan childrens | Politics Marathi News - Sarkarnama

सोनिया गांधींची पंतप्रधान मोदींना भावनिक साद; अनाथ मुलांबाबत केलं आवाहन

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 20 मे 2021

आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने अनेक मुलांचे छत्र हरवले आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनामुळे अनेक कुटूंब उध्वस्त झाली आहेत. आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने अनेक मुलांचे छत्र हरवले आहे. त्यामुळे त्यांच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मुलांसाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) भावनिक साद घातली आहे. (Sonia Gandhi makes suggestion to safeguard future of orphan childrens)

सोनिया गांधी यांनी अनेक मुद्यांवर सातत्याने पंतप्रधान मोदींचे पत्राद्वारे लक्ष्य वेधले आहे. लसीकरण, कोरोना चाचण्या, गरजुंना मदत, कोरोनाविषय धोरण अशा अनेक मुद्यांवर त्या सातत्याने पंतप्रधानांना पत्र पाठवत विविध सुचना करतात. गुरूवारीही त्यांनी आणखी एक पत्र पंतप्रधानांना पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या भवितव्याची चिंता व्यक्त केली आहे. 

हेही वाचा : 'ब्लॅक फंगस'चे राज्यात 90 मृत्यू; 500 रुग्ण झाले बरे

अनाथ झालेल्या बालकांना केंद्र सरकारने नवोदय विद्यालयांमध्ये शिक्षण द्यावे, असा सल्ला पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी दिला आहे. राहुल गांधी यांनीही या सूचनेची दखल घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांच्या मदतीसाठी काही राज्यांनी मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेश, दिल्ली या राज्यांनी अशा बालकांना शोधण्यासाठी समित्यांची देखील नियुक्तीही केली आहे. पण या अनाथ बालकांच्या संगोपनाची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. 

कोरोना संकटात अनेक बालकांनी आई-वडिलांना किंवा दोघांपैकी एकाला गमावले आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या शिक्षणाची, भवितव्याची काळजी घेण्यासाठी कुटुंबात जबाबदार व्यक्ती नसल्याने केंद्र सरकारने अशा बालकांच्या संगोपनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सोनिया गांधींनी केले आहे. या बालकांमध्ये उज्वल भवितव्याची उमेद जागविण्याची राष्ट्र म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केलं आहे. 

राजीव गांधींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात नवोदय विद्यालये सुरू झाल्याची आठवणही त्यांनी पंतप्रधान मोदींना करून दिली. ही विद्यालये राजीव गांधींच्या अनेक महत्त्वाच्या योगदानांपैकी एक असून ग्रामीण भागातील गुणवान विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण सहजपणे मिळावे, हा त्यामागचा उद्देश होता. सध्या देशात ६६१ नवोदय विद्यालये असून या बालकांना विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण देण्याचा विचार सरकारने करावा, असे सोनिया यांधी यांनी म्हटलं आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख