बॉलीवूड कलाकारांशी संबंध असलेल्या सहा ड्रग्ज वितरकांना मुंबई-गोव्यामधून अटक  - Six drug dealers linked to Bollywood actors arrested from Mumbai-Goa | Politics Marathi News - Sarkarnama

बॉलीवूड कलाकारांशी संबंध असलेल्या सहा ड्रग्ज वितरकांना मुंबई-गोव्यामधून अटक 

वृत्तसंस्था
रविवार, 13 सप्टेंबर 2020

एनसीबीने  मुंबई, गोवा येथे शोधमोहीम राबवली असून याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. कारवाईच्या भीतीने अनेक ड्रग्स वितरक भूमिगत झाल्याची माहिती आहे.

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बॉलीवूड सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवणाऱ्या रॅकेटचा माग घेणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मुंबई, गोवा येथे शोधमोहीम राबवली. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. कारवाईच्या भीतीने अनेक ड्रग्स वितरक भूमिगत झाल्याची माहिती आहे.

शोधमोहिमेत करनजीत सिंग आनंद (वय 23) याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गांजा जप्त करण्यात आला आहे. दादर पश्‍चिम येथून डायवान अँथोनी फर्नांडिस याच्यासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. फर्नांडिस हा गांजा वितरक असून त्यांच्याकडून 500 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. पवई येथील कारवाईत अंकुश अरेने (वय 29) या वितरकालाही अटक करण्यात आली. तो करनजीत सिंगकडून गांजा घेत असे. यापूर्वी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अनुज केशवानी याला अंकुशने ड्रग्ज दिल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून 42 ग्रॅम चरस व सव्वा लाख रुपयांची रोख जप्त करण्यात आली आहे. याशिवाय गोवा येथील कारवाईत क्रिस कोस्टा याला अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करणाऱ्या एनसीबीने पेज थ्री सेलिब्रिटींशी संबंधित अनुज केशवानी या बड्या वितरकाला अटक केल्यानंतर ड्रग्ज पुरवणाऱ्या रॅकेटशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. फैयाज अहमद, कैझान, झैद विलात्रा व अनुज केशवानी यांच्या अटकेनंतर त्यांच्याशी धागेदोरे जुळलेले तसेच बॉलीवूड वर्तुळात ड्रग्ज पुरवठा करणारे डझनभर वितरक आता भूमिगत झाले आहेत. त्यासाठी एनसीबीने रविवारी विशेष शोधमोहीम राबवली. याप्रकरणी काही बॉलीवूड सेलिब्रिटींची यादी एनसीबीने तयार केली आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला अटक केली आहे. रियाचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून, तिची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली. रियाने एनसीबीला दिलेल्या वीस पानांच्या जबाबात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. याचबरोबर बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनही समोर आले आहे. 

रियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.  

रियाने एनसीबीला 20 पानी जबाब दिला आहे. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आली आहेत. सुशांत हा लोणावळ्यातील फार्महाऊसवर बॉलीवूडमधील सेलिब्रेटींसाठी ड्रग्जच्या पार्ट्या आयोजित करीत असे, असा दावा रियाने केला आहे. मात्र, या पार्ट्यांमध्ये सहभागी असल्याचा इन्कार तिने केला आहे. सुरुवाताली एका चित्रपट निर्मात्यानेही सुशांतला कोकेन आणि एलएसडीचा वापर होत असलेल्या पार्ट्यांना नेले होते. 
Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख