आणीबाणीत सावकार रडकुंडीला आले होते आणि लाचखोरीलाही आळा बसला होता..

आणीबाणीत पंतप्रधान इंदिराबाईंनी खासगी सावकारीवर बंदी घातली होती.
Sarkarnaa Banner (60).jpg
Sarkarnaa Banner (60).jpg

पुणे :  इंदिरा गांधी Indira Gandhi यांनी ता. २५ जून १९७५ या दिवशी देशात आणीबाणी Emergency लागू केली. देशभर भयाचे व असुरक्षिततेचे सावट निर्माण झाले होते. पत्रकार  कामिल पारखे यांनी आणीबाणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. 

''आणीबाणीत पंतप्रधान इंदिराबाईंनी खासगी सावकारीवर बंदी घातली होती आणि त्यामुळे कुणीही या सावकाराकडे येऊन गहाणखतात ठरलेली रक्कमेतील एक पैसुद्धा न देता आपली गहाण ठेवलेली दागदागिने आणि भांडीकुंडी परत नेऊ शकत होते. ही माहिती देशातील खेड्यापाड्यातील गरीब लोकांपर्यंत कर्णोपकर्णी पोहोचली तशी या सावकारांकडे गहाण ठेवलेली आपले दागदागिने, भांडीकुंडी वगैरे सोडवून घेण्यासाठी हे लोक झुंडीने येत होते,'' असे कामिल पारखे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कामिल पारखे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात... 
 
इंदिराबाईंनी आणीबाणी लादली तेव्हा मी नुकताच दहावीत गेलो होतो.  इतक्या लहान वयात असूनही  त्याकाळातली ती घोषित आणिबाणी मी अनुभवली आहे, जगलो आहे. आणि यात अतिशयोक्ती अजिबात नाही. आणीबाणीचा पहिलाच दिवस असल्याने त्या बातम्यांत सेन्सारशिप नव्हती. त्यानंतरच्या काही दिवसांच्या वर्तमानपत्रांतील बातम्या मात्र वेगळ्याच स्वरूपाच्या होत्या. बातम्यांतील अनेक वाक्यांमधील काही शब्दांची जागा कोरी होती. अनेकदा काही वाक्येच्या वाक्ये गाळली होती. पॉकेट कार्टूनची जागाही कोरीच होती. आतल्या पानांतील अग्रलेखांच्या स्तंभाची जागाही कोरी होती. त्याकाळात मुद्रणासाठी खिळ्यांची अक्षरे वापरत असत. त्यामुळे बातम्या कंपोझ करण्यास खूप वेळ लागे. 

वृत्तपत्रात हजर असलेल्या सेन्सॉर अधिकाऱ्याने एखाद्या वाक्यास आक्षेप घेतल्यास ते वाक्य वगळावे लागे आणि छपाईची डेडलाईन पाळण्यासाठी तेथे पर्यायी शब्दरचना वा वाक्यरचना करण्याऐवजी कोरी जागा वा रकाने ठेवणे भाग असे. मात्र काही गाळलेले शब्द, वाक्ये आणि कोरी ठेवण्याचे कारण काय असावे यासंबंधी तर्क करणे रोज वर्तमानपत्रे वाचणाऱ्या वाचकांस अवघड नव्हते. काही वृत्तपत्रे आणीबाणीस प्रतिकात्मक पद्धतीने विरोध करण्यासाटी मुद्दाम या जागा कोऱ्या ठेवता असत. ही बाब सेन्सार अधिकाऱ्यांच्याही लक्षात आली आणि मग वृत्तपत्रातील कोणताही रकाना, स्तंभ रिकामा ठेवण्यास वा वाक्यांतील शब्द गाळण्यात मनाई करण्यात आली.  वृत्तपत्रे पुन्हा पहिल्यासारखी प्रसिद्ध होऊ लागली होती. मात्र ती गेल्या काही महिन्यांसारखी वाचनीय नव्हती हे मात्र खरे होते.

श्रीरामपूरात आमचे टेलरिंगचे दुकान ` पारखे टेलर्स' मुख्य रस्त्यावर सोनार लेनमध्ये होते. त्याकाळी तेथील बहुतेक सर्व सोनार लोक सावकारीचाही धंदा करत असत. आणीबाणी लागू झाल्यानंतर काही दिवसातच या गल्लीतील वर्दळ वाढली. येथील सोनारांच्या दुकानात येऊन अनेक लोक, कुटुंबातील पुरुष, बायका आणि मुले त्यांनी तेथे गहाण ठेवलेली सोन्या-चांदीची दागिने, पाणी तापवण्याचा बंब, पाण्याचे घंगाळ, हंडी वगैरे पितळाची आणि तांब्याची भांडीकुंडी आपापल्या घरी घेऊन जाऊ लागले.

नकार देण्याची कुणाही सावकाराची हिंमतच नव्हती

आणीबाणीत पंतप्रधान इंदिराबाईंनी खासगी सावकारीवर बंदी घातली होती आणि त्यामुळे कुणीही या सावकाराकडे येऊन गहाणखतात ठरलेली रक्कमेतील एक पैसुद्धा न देता आपली गहाण ठेवलेली दागदागिने आणि भांडीकुंडी परत नेऊ शकत होते.  ही माहिती देशातील खेड्यापाड्यातील गरीब लोकांपर्यंत कर्णोपकर्णी पोहोचली तशी या सावकारांकडे गहाण ठेवलेली आपले दागदागिने, भांडीकुंडी वगैरे सोडवून घेण्यासाठी हे लोक झुंडीने येत होते. ठरलेले व्याज वसूल न करता गहाण ठेवलेल्या वस्तू सावकार मुकाटपणे या लोकांना परत करत होते. तसा नकार देण्याची कुणाही सावकाराची हिंमतच नव्हती. आणीबाणी काळाचा हाच तर महिमा होता. एखादा सावकार गहाण वस्तू परत करत नाही अशी कुणी पोलिसांकडे तक्रार केली असती तर त्या सावकाराची ताबडतोब तुरुंग कोठडीत रवानगी झाली असती. समाजाच्या अगदी खालच्या तळागाळातील लोकांना आणीबाणी लागू झाल्यानंतर असा थेट फायदा झाला होता.

आणीबाणी लागू केल्यानंतर सामान्य माणसाला दिलासा देणारी आणखी एक बाब होती. सरकारी ऑफिसात सर्वसामान्य लोकांची कामे कसल्याही प्रकारची लाच न देता तत्परतेने होऊ लागली. लाच मागण्याची कुणा अधिकाऱ्याची वा कर्मचाऱ्याची हिम्मत होत नसे. मात्र जनतेची कामेही तत्परतेने होत असत. दिल्लीत नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकमध्ये मुख्य सचिवापासून सर्व सरकारी कर्मचारी सकाळी वेळेवर कार्यालयात येऊ लागले आणि शिस्तबद्ध पद्धतीने कामे करू लागले. संपूर्ण देशभर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांत असेच चित्र दिसू लागले. 

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com