साहेब तुम्ही तिकीट द्या; शरदरावांना 101 टक्के निवडून आणतो : भोसलेंनी व्यक्त केला होता पवारांच्या विजयाचा विश्‍वास  - Sir you give the ticket; Brings Sharad Rao 101 per cent elected: Bhosle had expressed confidence in Pawar's victory | Politics Marathi News - Sarkarnama

साहेब तुम्ही तिकीट द्या; शरदरावांना 101 टक्के निवडून आणतो : भोसलेंनी व्यक्त केला होता पवारांच्या विजयाचा विश्‍वास 

संतोष शेंडकर 
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

अरे तुला मिसरुडपण फुटलेले नाही. तू काय शरदला निवडून आणणार?

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : "अरे तुला मिसरुडपण फुटलेले नाही. तू काय शरदला निवडून आणणार?' असा सवाल दस्तुरखुद्द यशवंतराव चव्हाण यांनी केला. त्यावर न घाबरता तो उंचापुरा तरुण म्हणाला, "साहेब तुम्ही तिकीट तर द्या. आम्ही सगळे जीव तोडून काम करतो आणि 101 टक्के शरदरावांना निवडून आणतो.' तो तरुण म्हणजेच पुणे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव भोसले होय. 

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे 1962 पासूनचे घनिष्ठ मित्र शिवाजीराव यशवंतराव भोसले (वय 81) वर्ष यांचे आज (ता. 30 ऑक्‍टोबर) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. शिवाजीअण्णा या नावाने ते परिचित होते. त्यांच्या निधनाने शरद पवार यांचा एक निष्ठावंत मोहरा गळाला आहे. 

वाणेवाडी (ता. बारामती) येथील शिवाजीराव भोसले हे 1992 मध्ये पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष झाले. याशिवाय 1972 च्या दुष्काळावेळी ते बारामती पंचायत समितीचे सभापती होते. त्या काळात रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवून तालुकाभर बंधारे, तलाव बांधण्याचे महत्वपूर्ण योगदान त्यांच्या नावावर आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे सदस्य, 1997-2003 या कालावधीत सोमेश्वर कारखान्याचे संचालक अशाही जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. 

युवक कॉंग्रेसच्या शाखा उभारणीच्या निमित्ताने शरद पवार वाणेवाडी गावात 1962 मध्ये दुचाकीवर आले होते. त्यावेळी एका पानटपरीवर त्यांची आणि शिवाजीराव भोसले यांची भेट झाली. दीर्घ संवाद झाला. पवार यांनी, "युवक कॉंग्रेसचे काम करशील का?' असे विचारले. काकडे गटाचा बालेकिल्ला असलेल्या सोमेश्वरनगर परिसरात हे तसे धाडसाचे काम. पण एका क्षणात भोसले यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर एकत्र राजकीय प्रवास सुरू झाला तो आजतागायत कायम होता. पवार बारामतीहून सोमेश्वरला यायचे आणि तिथून दुचाकीवर शिवारीजावांना घेऊन पुण्याला-मुंबईला जायचे. अनेकदा एसटीनेही एकत्र गप्पा मारत प्रवास व्हायचा. शारदाबाई पवार यांचेही ते अत्यंत विश्वासू होते. 

1967 च्या ऐतिहासिक निवडणुकीत शरद पवारांना तिकीट मिळू नये; म्हणून तालुक्‍यातील व तालुक्‍याबाहेरील बरीचशी मंडळी प्रयत्नशील होती. यशवंतराव चव्हाणांनाही लोक भेटले होते. दुसरीकडे तालुक्‍यातील काही तरुण मंडळी शरद पवार यांची शिफारस घेऊन रेल्वेने मुंबईला यशवंतराव चव्हाण यांच्याकडे गेली. यशवंतरावांचे रूबाबदार व्यक्तीमत्व बघून बोलणार कोण? असा प्रश्‍न होता. पण, अण्णा जात्याच धाडसी आणि निर्भिड. सगळ्यांच्या वतीने ते म्हणाले, "साहेब शरदरावांना तिकीट द्या' त्यावर, "अरे तुला मिसरूड पण फुटले नाही, तू काय शरदला निवडून आणणार?' असा प्रतिप्रश्न करून चव्हाणांनी त्यांची परीक्षा घेतली. यावर भोसले यांनी "101 टक्के निवडून आणणार' असा आत्मविश्वास प्रकट केला. 

काकडे गटाचे ज्येष्ठ नेते बाबालाल काकडे यांच्याविरोधात पवारांनी ती चुरशीची निवडणूक लढविली होती. काकडे गटाचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या पश्‍चिम भागाची पवारांना चिंता होती. शिवाजीराव व अन्य निष्ठावंतांना ते म्हणाले, "तुमच्या भागात माझ्या आणि विरोधी पक्षाच्या मतांमध्ये हजार-दीड हजारांपर्यंतच फरक ठेवा. इतरत्र तो भरून काढू.' पण निष्ठावंतांनी जिकीरीने काम करून उलट 1600 चे मताधिक्‍य मिळवून दिले होते. 

सोमेश्वर कारखान्याचे 1992 मध्ये 35 वर्षांनंतर काकडे गटाकडून पवार गटाकडे हस्तांतर झाले. यातही शिवाजीरावांचा मोलाचा वाटा होता. 1981 च्या कारखान्याच्या निवडणुकीत पवारसाहेबांना मानणाऱ्या गटाला पुरेसे सहकार्य न मिळाल्याने शिवाजीराव नाराज झाले होते. परंतु ज्येष्ठ नेते चंदरराव तावरे यांनी, दोघांना घरी बोलवून दिलजमाई करून दिली होती.

भोसले यांच्या घरच्या लग्नात पोस्टाने पत्रिका पाठविल्यावरही शरद पवार मुख्यमंत्री असताना हजर राहिले होते. भोसले यांच्या मुलीच्या लग्नात (स्व.) अप्पासाहेब पवार हे स्वतः वधूपक्षाकडून पाहुण्यांचे स्वागत करायला दोन तास उभे होते, इतका पवार कुटुंबीयांशी भोसले यांचा ऋणानुबंध होता. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख