रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेले दुकान : शिवसेनेची टीका - shivsena targets Ramda Athwale for demanding president`s rule in Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेले दुकान : शिवसेनेची टीका

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

आठवले मुंबईतील वादात भलतेच सक्रिय झाले आहेत. 

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सध्या महाविकास आघाडीच्या विरोधात हिरिरीने उतरले आहेत. अभिनेत्री कंगनाला भेटणे, राज्यपालांशी संवाद साधणे, शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या शर्मा यांना भेटणे या बाबी त्यांनी केल्याच. पण महाराष्ट्र सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करून त्यांनी खळबळ उडवली. त्यांच्या मागणीचा समाचार परिवहनमंत्री अनिल परब यांनी घेतला असून रामदास आठवले हे अर्ध शटर बंद झालेले दुकान आहे. त्यामुळे जे उघडे आहे, त्याला किती महत्त्व द्यायचे, हे ज्याने त्याने ठरवावे, असा टोला त्यांनी लगावला.

केंद्र सरकारकडे हजारोंच्या संख्येने विषय आहेत. त्याकडे लक्ष दिले जात नाही. किरकोळ विषयांकडे लक्ष देऊन स्थानिक राज्य सरकारच्या विरोधात असंतोष माजविण्याचे काम सुरू आहे. चीनने भारताच्या भूमीच्या दिशेने एक पाऊल पुढे ठेवले आहे. मात्र पाहिजे तिथे लक्ष नाही. पण ज्या राज्यात सत्ता नाही ती मिळवायला त्यांचे जास्त लक्ष आहे, अशी टीका परब यांन केंद्र सरकारवर केली.

मराठा आराक्षण हा सर्वपक्षीय प्रश्न आहे. यात पक्षीय राजकारण नाही. न्यायालयाने `मेरिट` चा विचार करून स्थगिती दिली आहे. मराठा आरक्षणात संघटना ज्या अग्रेसर होत्या त्यांची बाजू मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. या सगळ्या लोकांना कसं आरक्षण द्यायचं, यावर विचार सुरू आहे. आताच्या मुलांचा भवितव्य जे टांगणीला लागलाय त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. आंदोलन करून फायदा होणार नाही. आम्ही तुमच्यासाठी भांडत आहे. आमच्यासोबत राहा. तुमच्या सूचना द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

 

काय म्हणाले होते आठवले?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात  गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तो सत्ताधारी शिवसेना पक्ष सूड बुद्धीने काम करीत आहे. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा या ज्येष्ठ नागरिकावर शिवसेनेने जबरी हल्ला केला त्या हल्ल्याचे समर्थनही शिवसेनेने केले आहे. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई पोलिसांनी केली नाही. हल्लेखोर जामिनावर बाहेर आहेत. कंगना राणावतला अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राज्यात वातावरण गढूळ झाले आहे. सूडबुद्धीने वागणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी पुढे आली आहे. हे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी या पुढे आलेल्या मागणीला माझा पाठिंबा असून त्यासाठी आपण केंद्रात प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख