वर्षभरात भाजपला दोनदा सुतक..शिवसेनेचा टोला  - Shivsena targets bjp Over Defeat in Pune Graduate constituency | Politics Marathi News - Sarkarnama

वर्षभरात भाजपला दोनदा सुतक..शिवसेनेचा टोला 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 डिसेंबर 2020

नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही.

मुंबई : पदवीधर मतदारसंघातील भाजपचा पराभव झाला आहे. यावरून शिवसेनेचा भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' तून भाजपवर टीका करण्यात आली आहे. "वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल," अशी टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे. 

महाविकास आघाडीचे सरकार तीनचाकी आहे, अशी टीका भाजपसारखे विरोधक वर्षभर करीत होते. यावर ‘‘सरकारला चाके चारच आहेत, चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे आहे,’’ असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी हाणला होता. तो विश्वास स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकांनी खरा ठरवला. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातील पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. धुळे-नंदुरबार विधान परिषदेची जागा काँग्रेसमधून भाजपात शिरलेल्या अमरीश पटेल यांनी जिंकली.

अमरीश पटेल यांची अशा प्रकारच्या निवडणुका जिंकण्याची कार्यपद्धती किंवा कौशल्य ज्यांना माहीत आहे ते या विजयाचे श्रेय भारतीय जनता पक्षाला देणार नाहीत, असे अग्रलेखात स्पष्ट करण्यात आले आहे. 

भाजपला पारंपरिक मतदारसंघ असलेला नागपूर आणि पुण्यात अपयश आले आहे, यावरून अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱयाची चाहूल आहे. वाऱयाने एक दिशा पकडली आहे व राज्यातील साचलेला, कुजलेला पालापाचोळा उडून जाणार आहे.

नागपुरातील पराभव धक्कादायक आहे, तितकाच पुण्यातील पराभवही भाजपसाठी ‘आत्मक्लेश’ करून घ्यावा असाच आहे.संघाचे मुख्यालय नागपुरात आहेच, पण संघ विचारी लोकांचे संघटन मजबूत असताना नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे अभिजित वंजारी येथे विजयी झाले, याचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही. कारण विधानसभा निवडणुकांतच नागपुरातील दोन जागा भाजपने गमावल्या व उरलेल्या तीन जागांवर भाजपचा निसटता विजय झाला होता. हे चित्र काय सांगते?, असा सवाल  'सामना' तून उपस्थित करण्यात आला आहे. 

  1. शरद पवार हे लोकनेते नाहीत असे बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली तेव्हा लोकांनीच त्यांना खाली पाडले.
  2. ‘‘आम्हीच येणार व आम्हीच जिंकणार’’ हा तोरा बरा नाही.
  3. बालेकिल्ल्यास सुरुंग लागलेच होते, आता पायाच खचला.
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख