परमबीर हे विरोधकांची 'डार्लिंग'; डोक्यावर घेऊन नाचत आहेत... - Shivsena slams opposition leaders over parambir singhs letter | Politics Marathi News - Sarkarnama

परमबीर हे विरोधकांची 'डार्लिंग'; डोक्यावर घेऊन नाचत आहेत...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 मार्च 2021

भाजपने देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी हा विरोधकांचा कट असल्याचा आरोप केला आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपने देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी हा विरोधकांचा कट असल्याचा आरोप केला आहे. आज 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे बेभरवशाचे आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे भाजपचे कालपर्यंत मत होते. पण आज भाजप त्यांना डोक्यावर घेऊन नाचत आहे. परमबीर सिंग यांना खांद्यावर घेऊन भाजपवाले लग्नाच्या वरातीत नाचावे तसेच बेभानपणे नाचत आहेत. आज परमबीर सिंग विरोधकांची डार्लिंग बनले आहेत. हा राजकीय विरोधाभास दिसतो, अशी टीका 'सामना'तील अग्रलेखात करण्यात आली आहे.

हेही वाचा : मुख्यंमत्री आज घेणार महत्वाची बैठक - राजकीय घडामोडींना वेग

अॅण्टिलिया स्फोटके प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे एनआयएच्या अटकेत आहेत. हे प्रकरण व्यवस्थित हाताळले नाही व पोलीस खात्याचीच बदनामी झाली असे मानून सरकारने पोलीस आयुक्तांना हटविले. "सचिन वाझे यांना हटवून काय फायदा. पोलिस आयुक्तांना हटवा" अशी भाजपची मागणी होती. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन मोदी-शहांना भेटतात व दोन दिवसांत परमबीर सिंग हे असे पत्र लिहितात. त्या पत्राचा आधार घेऊन विरोधक हंगामा करत आहेत, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 

दरम्यान, आज पत्रकार परिषदेत बोलताना शिवेसनेचे नेते व खासदार संजय राऊत म्हणाले, संजय राठोड आणि देशमुखांची तुलना करू नका. राठोड यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा नाही. पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनीही राठोडांवर आरोप केले नाहीत. तरीही त्यांचा राजीनामा घेतला आहे. राष्ट्रवादी प्रमुखांनी जर देशमुखांवर झालेल्या आरोपांची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असेल तर त्यात चुक काय आहे? असे आरोप देशातील अनेक नेत्यांवर झाले आहेत.  

भाजपवरच बुमरँग होईल

देशमुख यांचे काय होणार हा महाराष्ट्र आणि देशापुढील गंभीर प्रश्न नाही. परमबीर सिंग यांच्यावर आरोप करणारे विरोधकांना आज त्यांच्यावरच जास्त विश्वास ठेवून तोफा डागत आहेत. हे त्यांच्यावरच बुमरँग होईल. परमबीर हे विरोधकांचे महत्वाचे हत्यार बनले आहेत. देशमुखांनी आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सरकार जर चौकशीचे आव्हान स्वीकारत आहे तर राजीनाम्याची मागणी का? मुख्यमंत्री याविषयी निर्णय घेतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले. 

सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही 

केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी वापर करून राष्ट्रपती राजवटीचे स्वप्न विरोधक पाहत आहेत. त्यांनी झोपेतून जागे व्हावे. कितीही प्रय़त्न केले तरी त्यांचे डावपेच यशस्वी होणार नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. सरकारच्या प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. विरोधकांनी किंवा एखाद्या अधिकाऱ्याने आरोप केले म्हणजे तडा जात नाही. पत्र हे पुरावा असु शकत नाही, असेही राऊत म्हणाले.

Edited By Rajanand More

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख