शिवसेना नेते अॅड. अनिल परब आहेत कुठे?  - Shivsena leader adv Anil Parab is not seen defending the government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

शिवसेना नेते अॅड. अनिल परब आहेत कुठे? 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 मार्च 2021

सरकारवर होत असलेल्या आरोपांनी राजकारण ढवळून निघालेले असताना एकटे संजय राऊत हेच लढताना दिसत आहेत.

मुंबई : विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना सामोरे जात शिवसेनेची बाजू भक्कमपणे सांभाळणारे नेते, कायदेशीर सल्लागार व परिवहन मंत्री अॅड. अनिल परब सध्या कुठेच दिसत नाहीत. सचिन वाझे प्रकरण, आयपीएस रश्मी शुक्ला बदली रॅकेट संदर्भातील गोपनीय अहवाल, फोन टॅपिंग प्रकरणावरून उडणारे राजकीय फटाके, परमबीर सिंग यांचे आरोप, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केलेले लक्ष्य यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेकडून एकटे खासदार संजय राऊत हेच लढताना दिसत आहेत. या घटनांबाबत परब यांचे मौन प्रकर्षाने जाणवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यानंतर निलंबित पोलिस अधिकारी सचिव वाझे यांच्यावरून विधानसभेत मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझेच्या अटकेची जोरदार मागणी केली. 

हेही वाचा : राज्यपाल मुख्यमंत्र्यांना बोलतं करणार? भाजपने केली ही मागणी

गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब? 

विधानसभेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मदतीला अनिल परब धावून आले होते. अनेकवेळा परब यांनी वाझे प्रकरणात सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावर फडणवीस यांनीही नुकतीच टीका केली होती. ''गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब? कारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरं अनिल परब देतात.'या नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट झालेच पाहिजे'', असे ट्विट फडणवीस यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांचे 'सहाय्यक' अशी टीकाही भाजपकडून केली जाते.

अधिवेशन संपलं अन्...

वाझे प्रकरणावरून राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझेला अटक केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर तोफ डागली. त्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली. त्यानंतर परमबीर यांनी सरकारवर लेटर बॉम्ब टाकत अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही चौकशीसाठी याचिका दाखल केली.

हेही वाचा : विधानसभेत तांडव ! आमदारांना लाथाबुक्क्या... फरफटत काढलं बाहेर

रश्मी शुक्ला यांचा बदल्यांच्या रॅकेटचा गोपनीय अहवाल समोर आला आहे. फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे हा अहवाल देत चौकशीची मागणी केली आहे. आज भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत विविध घटनांवर मुख्यमंत्र्यांकडून अहवाल घेण्याची मागणी केली आहे. फोन टॅपिंग प्रकरण गाजत आहे. त्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचे सत्ताधारी नेतेही मान्य करत आहेत. 

संजय राऊत पुढे, अनिल परब कुठे?

विरोधकांकडून होत असलेली टीका अन् राज्यातील घडामोडींवर शिवसेनेची बाजू मांडताना खासदार संजय राऊत हेच पुढे दिसत आहेत. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत ते सरकारच्या बाजूने खिंड लढवत आहेत. पण शिवसेनेची कायदेशीर बाजू सांभाळणारे अनिल परब कुठेच दिसत नाहीत. अधिवेशनामध्ये देशमुखांच्या बाजूने उभे राहणारे अनिल परब यांची काहीच प्रतिक्रिया काही दिवसांत आलेली नाही. सोशल मिडियावरूनही त्यांनी विरोधकांचा समाचार घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्यांचे मौन चर्चेचा विषय ठरले आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या मौनावर विरोधकांकडून टीका होत असताना परब यांचे मौनही प्रकर्षाने जाणवत असल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख